केंद्राकडून जारी झालेली आकडेवारी देऊनच शिवसेनेनं दिलं जावडेकरांना प्रत्युत्तर!

मुंबई: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड वरील लसीचे पाच लाख डोस वाया घालवल्याचा आरोप केल्यानंतर त्याला शिवसेनेने आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जावडेकर यांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यात पाच लाख डोस वाया घालवल्याचा आरोप त्यांनी केल्याने त्याला महाराष्ट्र सरकारकडून आणि शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जावडेकर यांनी पाच लाख डोस वाया घालवले असा जो आरोप महाराष्ट्रावर केला आहे तो करताना त्यांनी भाजपचे सरकार असलेल्या राज्यांची स्थिती पण बघायला हवी होती, असा टोलाच शिवसेनेने लगावला आहे. शिवसेनेने कोणत्या राज्यात आतापर्यंत किती कोविड लस वाया गेल्या याची आकडेवारीसुद्धा दिली आहे. मुख्य म्हणजे केंद्राकडून जारी झालेलीच ही माहिती आहे.
कोणत्या राज्यात किती टक्के लस वाया गेल्या?
तेलंगण – १७.५ %
आंध्र प्रदेश – ११.५ %
उत्तर प्रदेश – ९.४ %
कर्नाटक – ६.९ %
जम्मू काश्मीर – ६.५ %
राजस्थान – ५.६ %
आसाम – ५.५ %
गुजरात – ५.३ %
पश्चिम बंगाल – ४.१ %
महाराष्ट्र – ३.२ %
ही आकडेवारी पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या लसपैकी ३.२ टक्के लस वाया गेल्या हे खरं असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत ते प्रमाण फारच कमी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची कावीळ झालेल्यांना सगळंच पिवळं दिसू लागलंय असं म्हणावं लागेल, असा टोला शिवसेनेने हाणला. महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकारला कसं बदनाम करता येईल हाच यांचा अजेंडा आहे, असा आरोपही शिवसेनेने भाजप आणि प्रकाश जावडेकर यांच्यावर केला. शिवसेनेच्या प्रसिद्धीप्रमुखांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.