शिंदेंनी दाखवून दिले, ‘ठाकरेंशी’ वैर नाही, मात्र, उद्धव तुमची खैर नाही…

एकनाथ शिंदे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

एकनाथ शिंदेंनी बंड करून गुवाहाटी गाठताच आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेतील एकेक शिलेदार आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. लोकसभेत राहुल शेवाळे यांना लोकसभेच्या गटनेतेपदी तर भावना गवळी यांना प्रतोद म्हणून नियुक्ती केली.

तसेच इतर राज्यातील शिवसेना प्रमुखांना आपल्याकडे खेचून त्यांचा देखील पाठींबा मिळवण्यात शिंदेंना यश आलेले आहे. संघटनात्मक पातळीवर शिवसेनेला कमजोर करत आपल्या गटाला मजबुती देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसलेली आहे.

कालच्या दसरा मेळाव्यात ठाकरे घरातील तीन सदस्य उपस्थित राहिले. यावरून तुलनेने राजकीय फायदा नसणाऱ्या लोकांनाही शिंदे जवळ करत आहेत, हे दिसून आले.

त्यामुळे ठाकरे घरातील माणसांना शिंदे आपलेसे का करत आहेत ? हा प्रश्न आहे

राज ठाकरे

एकनाथ शिंदे हे गुवाहाटीत असताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार आणि अपक्ष आमदार यांचा गट विलीन करण्याची वेळ आल्यास राजकीय पर्यायाचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी मनसे हा उत्तम पर्याय ठरू शकेल. राज आणि शिंदे यांच्यात दोनवेळा बोलणी झाल्याची माहिती मिळाली होती.

पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी उघडपणे शिवसेना फुटीस उद्धव ठाकरेंना कारणीभूत ठरवले होते. बाळासाहेबांच्या पुत्र प्रेमामुळेच शिवसेनेत फुट पडली होती, असे सांगत आपण का बाहेर पडलो, याचे कारण त्यांनी सांगितले होते.

पुढे गणपती दर्शनासाठी एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली होती. त्यांनतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राज ठाकरेंनी गणेशदर्शनासाठी हजेरी लावली होती. या घटनांतून दोघांमधील संबध पूर्वीप्रमाणेच जिव्हाळ्याचे असल्याचे दिसून आले होते.

उद्धव ठाकरेंशी वैर घेतलेल्या शिंदेंनी राज ठाकरेंसोबतचे संबध आणखी दृढ करण्यावर भर घेतला. ज्याचा त्यांना राजकीय फायदा होईलच असे नाही. पण एका ठाकरेंशी वैर खेळायला सुरुवात करतानाच दुसर्या ठाकरेंना जवळ करणे शिंदेंनी पसंद केले.

स्मिता, निहार आणि जयदेव : ठाकरेंचा शिंदेंना पाठींबा

एकनाथ शिंदेंच्या शपथविधीनंतर २६ जुलै ला स्मिता ठाकरे आणि बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना भेटून पाठींबा देऊ केला होता. स्मिता आणि निहार देखील शिंदेंच्या घरी गणेश दर्शनाला गेले होते.

एवढेच काय तर महाराष्टातील सत्तासंघार्षाबाबतच्या सुनवीदरम्यान निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठींबा देण्यासाठी सुप्रीम कोर्टात उपस्थिती लावली होती. त्यानंतर थेट दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर स्मिता व निहार यांना स्थान देण्यात आले.

एकटा नाथ होऊ देऊ नका – जयदेव ठाकरे

विशेष म्हणजे आजवर ठाकरे-शिंदे वादापासून दूर असणारे जयदेव ठाकरे हे ही दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दिसले.

‘एकनाथ शिंदेंनी दोन चार भूमिका घेतल्या. त्या खूप चांगल्या होत्या. त्या मला आवडल्या. असा धडाडीचा माणूस आपल्याला हवाय. म्हणून मी त्याच्या प्रेमासाठी आलोय. यांना एकटे पडून देऊ नका, हा एकटा नाथ होऊ देऊ नका. हा एकनाथच राहू द्या. माझे म्हणणे आहे हे बरखास्त होऊ दे आणि शिंदे राज्य येऊ द्या, असे म्हणत जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिला.

ठाकरेंशी आपले वैर नाही, मात्र, उद्धव ठाकरे तुमची खैर नाही

राकारानापासून दूर असलेल्या जयदेव ठाकरेंचा लाखोंच्या गर्दीसमोर पाठींबा मिळविल्याने एकनाथ शिंदे यांनी आपले पारडे जड होईल याची काळजी घेतल्याचे दिसते.

यावरून मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

‘बिंदू माधव आज आपल्यात नाहीयेत. ते स्वर्गवासी झाली. त्यांचे चिरंजीव आज एकनाथ शिंदेंसाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत. उद्धव ठाकरेंचे बंधू येथे जयदेव ठाकरे येथे येऊन गेले आणि त्यांना आशीर्वाद दिला. तुमचे चुलत बंधू राज ठाकरे आज तुमच्यासोबत नाहीयेत. मग तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत. तर महाराष्ट्राच्या जनतेच्या कुटुंबाला कसं काय सांभाळणार आहात’, असे टीकास्त्र रामदास कदम यांनी डागले.

शिंदेंनी आता थेट ठाकरे कुटुंबातील सदस्यांचा पाठींबा मिळवून उद्धव ठाकरे एकटे पडले असल्याचे दाखवून दिले आहे. ‘ठाकरेंशी’ आपले वैर नाही, मात्र, उद्धव ठाकरे तुमची खैर नाही, असा संदेश शिंदेंनी दिल्याचे दिसते.

अधिक वाचा :

एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याची ‘परंपरा’ चालवू शकतील का?


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *