तिला गांधी हे येशूचे रूप वाटायचे…

मिराबेन यांचा जन्म २० नोव्हेंबर १८९२ मध्ये एका सुसंस्कृत ब्रिटिश कुटुंबात झाला होता. तिचे वडील सर एडमंड स्लेड रॉयल नेव्हीमध्ये अधिकारी होते. वडील जास्त दिवस बोटीवरच राहत असल्यामुळे मेडलिनची आई तिला घेऊन माहेरी ‘मिल्टन हिथ’ या गावी राहत असायची. मेडलीन शाळेत कधी गेलीच नाही. एकटीच स्वतः सोबत आणि निसर्गासोबत ती खेळात रमुन जायची. तिला संगीताची आवड होती. जर्मन संगीतकार बिथोविनची रचलेली गाणी व संगीतबद्ध गाणी तिला आवडत असायची. तिची ही आवड लक्षात घेऊन तिच्या वडीलांनी तिला पियानो गिफ्ट केला होता. मेडलीनने बिथोवीनचे चरित्र लिहिले परंतु त्या हयात असेपर्यंत ते प्रकाशित होऊ शकले नाही.
१९०८ मध्ये तिच्या वडिलांची बदली मुंबईला झाली व मेडलीन ही पहिल्यांदा भारतात आली होती तेव्हा तीच वय अवघं १५ वर्ष होते. भारतात राहिलेल्या त्या दोन वर्षात तिचे जीवन ऐशोआरामात गेले. त्यामुळे खऱ्या हिंदुस्तानची तिला ओळख झालीच नाही. भारतातून ती लंडनला परतली. लंडनमध्ये फ्रान्सचे नोबेल विजेते रोमॉरोलॉ यांच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी मेडलीनला महात्मा गांधी यांच्याबद्दल विचारले. परंतु मेडलीने नकारार्थी उत्तर दिल्यावर त्यांनी ‘गांधी येशू चे दुसरे रूप आहे’ असे म्हणत गांधींची ओळख करून दिली. त्यानंतर मेडलीनला महात्मा गांधी यांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग तिने त्यांच्याबद्दल भरपूर वाचन सुरू केले आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
मेडलीन गांधीजींना मनोमन गुरु मानत. लिखाण वाचत होती. एकदा तिने गांधीजींना पत्र लिहिले, “तुम्ही केलेल्या उपदेशांप्रमाणे मी शिकार करणे सोडले आहे, मांसाहार करणे सोडले आहे, सात्विक आहार घेणे सुरू केले. हिंदुस्थानातील खादीचा वापर करतेय, चरख्यावर लोकरीचे धागे काढणे इत्यादी कामे मी करते आहे, आश्रमातील व्यक्तीं सारखे वागत आहे.” असे लिहिता तिने भारतात येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर गांधीजींनी, “एका वर्षानंतर तुझा निश्चय पक्का राहिला तर जरुर ये.” असे कळविले.
गांधीजींचे हे उत्तर ऐकून ती आनंदित झाली आणि भारतात परतण्याची तयारी तिने सुरू केली. गांधीजींनाही पक्का विश्वास होता किती जरूर भारतात येईल. २५ ऑक्टोबर १९२५ मध्ये ‘पीअँण्डओ लायनर’ या बोटीने लंडन सोडले व ६ नोव्हेंबर १९२५ मध्ये ती मुंबई बंदरात उतरली. तिच्या स्वागतासाठी गांधीजींनी वल्लभभाई पटेल, स्वामी आनंद आणि महादेवभाई देसाई यांना पाठवले होते. आश्रमातील सदस्यांनी तिच्यासाठी साबरमती आश्रमात एक खोली तयार करून ठेवली होती. आणि बाकीच्या व्यक्तीसारखे तिला वागण्यास सांगितले.
आश्रमात येऊन मेडलीनचे नामकरण मीरा असे झाले. तिला सर्व प्रेमाने मीरा बहेन म्हणायचे. १९२८ पासून तिने जोमाने खादी प्रचार आणि गांधीं विचार प्रस्तुत करण्यासाठी बिहारचा दौरा केला. त्यानंतर मीरा बहेनने गांधीजींच्या सोबत लाहोरचे अधिवेशनात ही हजेरी लावली. १९३० चा मिठाच्या सत्याग्रहवेळी आश्रमाची संपूर्ण जबाबदारी मीरा बहेनवर होती. रोजच्या रोज साबरमती आश्रमाचा अहवाल गांधींना पाठवत असे. १९३१ मध्ये झालेल्या गांधीं -आयर्विन भेटी दरम्यान दिल्लीला गांधींसोबत त्या उपस्थित होत्या. १९३१ साली दुसऱ्या गोलमेज परिषदेतही त्या उपस्थित होत्या.
सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान त्या हिंदुस्थानातील सद्यस्थिती इंग्लंड -अमेरिका, फ्रान्स, स्विस, या देशातील मित्रांना पाठवत व ब्रिटिश सरकार जनतेवर कशाप्रकारे अत्याचार करते हे दाखवून देत होत्या. त्यामुळे त्यांना ३. महिन्यांचा कारावास झाला होता. सुटका झाली आणि त्यांनी राजेंद्रप्रसाद यांची भेट घेतली आणि पुन्हा त्यामध्ये एका वर्षाचा कारावास झाला. १९३८ मध्ये अंबालाल साराभाई यांनी त्यांच्या परदेशी प्रचार दौऱ्याचा खर्च उचलला. या दौऱ्यात परदेशातील महत्वाच्या व्यक्तींना भेटीगाठी घेऊन त्यासंबंधीचा सर्व अहवाल त्या दर आठवड्याला गांधीजींना पाठवीत होत्या.
चलेजाव आंदोलनाच्या तयारीच्या वेळेस गांधींनी मीरा बहेनवर तीन जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. त्या म्हणजे मद्रासला जाऊन राजगोपालचारी यांना महत्व पटवून देणे, दिल्लीत व्हॉइसरॉय व वरिष्ठ शासकीय अधिकारी यांना आंदोलनाची कारणीमिमांसा समजावून सांगणे, ईशान्य भारतावर जपानी आक्रमणाची शक्यता असल्याने अहिंसा आणि असहकारच्या मार्गाने जपान्यांचा सामना करणे यापैकी त्यांनी तिसऱ्या कामाची जबाबदारी स्वीकारली होती.
साहित्यात ही त्यांनी खूप लक्ष घातले. ऋग्वेदतील काही भागाचे इंग्रजी भाषांतर करण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १९४०-४१ या एका वर्षात मौनव्रत धारण करून हिमालयात भाषांतरे पूर्ण केली. त्यांच्या अखेरच्या काळात त्या भगवी कफनी घालत असायच्या. मीरा बहेन यांनी आयुष्यभर गांधी विचारांची जपणूक केली. गांधीं आणि ब्रिटिश सरकार यातील दुवा म्हणून कार्य केले. मीरा बहेन या गांधींच्या मानसकन्या होत्या. तीस वर्षे भारतात राहून सर्व विधायक आणि राजकीय कार्यक्रमात पडद्याआड राहून स्वातंत्र्य चळवळीत अपूर्व असे योगदान दिले आणि २० जुलै १९८२ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
त्यांना १९८९ ला दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित केले. भारताच्या जर्मनीतील राजदूतांनी व्हिएन्नाला जाऊन सरकारच्या वतीने पुरस्कार प्रदान केला. त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते.