शरद पवारांचा भाजपवर निशाणा, म्हणतात हा तर ‘रडीचा डाव’ !

मुंबई : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसला बहुमताने विजयी केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवताच संपूर्ण देशातून ममता बॅनर्जींवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. दरम्यान सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून विजयी झाल्याची माहिती समोर आली. ममता बॅनर्जी यांनी १२०० मतांनी भाजप उमेदवार शुवेंदू अधिकारी यांचा पराभव केल्याची माहिती होती. मात्र, त्यानंतर थोड्याच वेळात ममता बॅनर्जी पराभूत झाल्याचं वृत्त समोर आलं. अखेर ७.३० वाजण्याच्या सुमारास ममता बॅनर्जी पराभूत झाल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. शुवेंदू अधिकारी यांनी १७३७ मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं, “पश्चिम बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. परंतु ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय त्याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल!.” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका करत नाराजी व्यक्त केली आहे.
रडीचा डाव!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!
बंगाल मिळवण्यात भाजपला अपयश
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची असलेली सत्ता घालवून आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठी स्ट्रॅटेजी आखली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी उतरले होते. भाजपचे दिल्लीतील अनेक दिग्गज नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते मात्र, असे असले तरीही बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसच्या पदरातच मते टाकून भाजपला नाकारले आहे.