शरद पवारांची वकिली थांबवा
ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे तपासण्याची गरज
मुंबई: युपीए अध्यक्ष पदावरून शिवसेना आणि कॉंग्रेस मध्ये जुंपली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे अशी मागणी केली होती. त्यावर कॉंग्रेस कडून जोरदार प्रतिहल्ला चढविण्यात येत आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत हे आम्हाला माहित आहे. शिवसेना नेते, प्रवक्ते, सामनाचे प्रवक्ते आहेत हेही आम्हाला माहित आहे. मात्र, अलीकडे त्यांचे नवीन रूप पाहायला मिळत आहे. ते सध्या शरद पवार यांचे प्रवक्त्या असल्यासारखे सारखे वागत आहे त्यामुळे हे योग्य नाही. जे युपीएचा हिस्सा नाही त्यांनी यावर बोलू नये असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. गेल्या काही दिवसापासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे अशी मागणी केली होती. विरोधी पक्ष बळकट करायचे असतील तर युपीए मध्ये अजून काही प्रादेशिक पक्ष यायला हवे असे त्यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले होते. यावर राज्यातील कॉंग्रेसनेत्यांनी टिका केली आहे. राजीव सातव, हुसेन दलवाई यांनी सुद्धा संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे.
नाना पटोले म्हणाले, जर आमच्या नेत्यावर टिका करायची असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल. हे आम्ही त्यांना ठणकावून सांगणार आहे. ज्या पवार साहेबांची वाकिली ते करत आहे ती त्यांनी थांबवावी असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला. जनतेच्या सर्व प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याच काम भाजप करत आहे. महाराष्ट्राला कस बदनाम करता येईल याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.