शरद पवारांचे जनतेला कळकळीच आवाहन

मुंबई: राज्यातील कोरोना बाधित झपाट्याने वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोव्हिड युद्धात सक्रीय झाले आहे. कोरोन वाढत असताना शरद पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे.
कोव्हिड-१९ च्या महामारीणे गंभीर रूप घेतले आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.
याबरोबर पवार म्हणाले, राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका व संलग्न कर्मचारी रूग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ह्या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. नागरिकांना आवाहन आहे की, शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा सल्ल्याने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतत पालन करावे. गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, स्वच्छता राखणे या सुचना कसोशीने पाळाव्यात. सभा-समारंभ वा गर्दीचे कार्यक्रम टाळावेत असा सल्ला सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील कळविण्यात येते की, त्यांनी देखील जनतेला ह्या अभूतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा. त्याचप्रमाणे राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरिता रक्तदान शिबीरांचे कार्यक्रम देखील हिरीरीने राबवावेत. मला खात्री आहे की, आपण धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर ह्या महामारीवर निश्चित मात करू असा विश्वास सुद्धा शरद पवार यांनी व्यक्त केला.