शरद पवारांवर एण्डोस्कोपीची शस्त्रक्रिया केली जाईल-नवाब मलिक
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
दरम्यान, पवार हे गेल्या आठवड्यात संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी दिल्लीत होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. त्यामुळे पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन देशमुखांचा बचावही केला होता. दरम्यान, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
मलिक आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला रुग्णालयात ॲडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपीची शस्त्रक्रिया केली जाईल अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.
शरद पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.