Sunday, September 25, 2022
HomeUncategorizedशरद पवारांनी खरंच बाळासाहेबांची 'शिवसेना' फोडली???

शरद पवारांनी खरंच बाळासाहेबांची ‘शिवसेना’ फोडली???

आधी काँग्रेस, मग राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना आणि आता शिंदे गट असा लांबलचक प्रवास केलेल्या दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा हात होता, असं दीपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकरांच्या या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दीपक केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते झाले. एकनाथ शिंदे यांची बाजू त्यांनी नेहमी ठामपणे मांडली.

आजपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार यांचा हात आहे. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवारांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या?, याचं उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असं केसरकर म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांनी खरंच शिवसेना फोडली का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय.

शिवसेनेच्या बंडात पवारांचा हात?

शिवसेनेत आतापर्यंत तीन मोठे बंड झाले. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं बंड… केसरकरांनी या तिन्ही बंडामध्ये शरद पवारांना आरोपांच्या चौकटीत उभं केलं आहे.

1990 च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळताच छगन भुजबळांना विरोधी पक्षनेतेपदाची आशा लागली होती. पण अपेक्षित संधी न मिळाल्याने ते 1991 च्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी कॉंग्रेसचा मार्ग स्विकारला. शिवसेना राज्यात सेट होत असतानाच छगन भुजबळ यांनी 17 आमदारांनी हाताशी धरत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बंडखोर आमदारांनी शिवसेनेकडे पाठ फिरवल्यानंतर मतदारसंघात अस्थिरता निर्माण झाली. त्याचा तोटा शिवसेनेला झाला. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद वाढली. मात्र, शिवसेनेने पुन्हा कमबॅक केल्याचं पहायला मिळालं होतं. शरद पवारांनी छगन भुजबळांना पाठिशी घातल्याचा आरोप केसरकरांनी केलाय.

युतीचं सरकार असताना मनोहर जोशी यांना जावयाच्या अवैध बांधकाम प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. 1999 मध्ये पुन्हा सरकार आले तर आपणच मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास नारायण राणे यांना होता.

मात्र, राणेंचं स्वप्न उद्धव ठाकरेंमुळेचं पूर्ण होऊ शकलं नाही, असं नारायण राणे आपल्या आत्मचरित्रात लिहितात. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदानंतर नारायण राणे यांनी शिवसेना सोडली.

शरद पवारांनी नारायण राणेंना विश्वासात घेत शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली, असं केसरकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर नारायण राणे यांना कोणत्या पक्षात जावं याबाबत शरद पवारांनी सल्ला दिला नव्हता, असा खुलासा देखील केसरकरांनी केला आहे.

छगन भुजबळ आणि नारायण राणे हे दोन धक्के पचवताच शिवसेनेला तिसरा धक्का राज ठाकरे यांच्या रूपाने बसला. हा धक्का ठाकरेंकडून ठाकरेंना बसलेला असल्याने याचे दूरगामी परिणामी शिवसेनेच्या राजकारणावर नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणावर झाले.

वर्चस्वाची लढाई ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादाचं कारण ठरलं. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यावेळी शरद पवारांनी राज यांना सल्ला दिल्याचं म्हटलं जातं.

दोन तीन वर्षापासून शिवसेनेत घुसमट होत असल्याने राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णयाला शरद पवारांनी पाठिंबा दिल्याचं केसरकरांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी देखील मोठा खुलासा केला होता. “शरद पवारांनी सल्ला दिला आणि मी तो ऐकला”, असं राज ठाकरे म्हणाले होते.

संजय राऊतांवर बंडखोर आमदारांची नाराजी-

शिवसेना आणि भाजप यांच्यातील कलगीतुऱ्यानंतर शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात राबवला. शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पुढाकारातून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं.

सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मानपानाची लढाई सुरू झाली. शिवसेना आमदारांची काम होत नाही आणि दुसरीकडे संजय राऊत शरद पवारांचं दररोज कौतुक करतात, त्यामुळे शिवसेना आमदार नाराज होते.

युतीचं सगळं मानपानावर अडलं, आधी फोन कोणी करावा यावरुन शिवसेना आणि भाजप युतीचा खोळंबा झाला होता. हा वाद मातोश्री आणि भाजपमधील असून आमच्यामधील नाही, असं रोखठोक वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं आहे.

हे ही वाचा की-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments