“राजकारणात मोठे व्हायचे असेल तर लातूरच्या बाहेर या” असा शरद पवारांचा सल्ला…

विलासराव देशमुख यांच्या राजकीय आयुष्यातल्या विधानसभेतील त्यांच्या पहिल्या भाषणानंतर त्यांचे अभिनंदन करून शरद पवार यांनी शाब्बासकी दिली होती. त्याच वेळी राजकारणात मोठे व्हायचे असेल तर लातूरच्या बाहेर या असा मोलाचा सल्ला शरद पवार यांनी विलासरावांना दिला होता. विलासरावांनी स्वतः या आठवणी बाबत लिहिले होते की, “राजकारणात मोठे व्हायचे असेल तर लातूरच्या बाहेर या, याच सल्ल्यामुळे आज मी या उंचीवर येऊन पोहोचू शकलो,” अशा शब्दात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
शरदराव पवार आणि विलासराव देशमुख यांच्या आपले राजकीय मतभेद जगजाहीर असताना दोघांच्या मनात एकमेकांबद्दल असलेला आदर आणि दोघांच्या सुसंस्कृत नेतृत्वामुळे एका आपलेपणाच्या धाग्याने हे दोन्ही नेते जोडले गेले होते. विलासरावांशी बोलताना त्याचा प्रत्यय आला. विलासराव त्यांच्या एका मुलाखतीत सांगत होते की, “विधानसभेत १९८० साली मी आमदार म्हणून निवडून आलो होतो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री होते. शरद पवार विरोधी पक्षनेते होते. पहिल्याच अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस मीच सुरुवात केली. माझी भाषण आटोपल्यानंतर लॉबीमध्ये येऊन शरद पवार यांनी मला म्हटले की, ‘तुम्ही खूप चांगले भाषण करता. खूप डेव्हलप होऊ शकाल. पण तुमच्या भाषणात लातूर-लातूर खूप आहे. तुम्हाला खूप पुढे जायचे आहे. राजकीय क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात मोठे काम करायचे असेल तर तुम्हाला लातूरच्या बाहेर येणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे लातूरचा विकास तर कराच, परंतु संपूर्ण महाराष्ट्र कडे सुद्धा व्यापक दृष्टीने बघा आणि म्हणून लातूरच्या बाहेर या.’
मुलाखतीत विलासराव पुढे सांगतात की, “माझ्या विधानसभेतील कामकाजाची सुरुवात नुकतीच होत होती. शरदराव पवार यांचा विधानसभेतील अनुभव माझ्यापेक्षा १३ वर्षांनी जास्त. परंतु नवीन आमदाराला त्याचा उत्साह वाढेल, त्याची उमेद वाढेल अशाच पद्धतीने त्यांनी मला शाबासकी दिली होती.”
शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात विलासरावांकडे बरीच खाती होती. शरद पवार तेव्हाही विरोधी पक्षनेते होते. विलासराव त्यांना बरेच जूनियर होते. तरीसुद्धा शरद पवारांसारखा मोठा नेता स्वतःहून सार्वजनिक कामे घेऊन संकोच न करता विलास रावण कडे येत असे. ते हक्काने विलासरावांना बोलू शकले असते आणि विलासराव देखील आदराने त्यांच्याकडे गेलेही असते. त्यांचे असे कामे घेऊन येणे विलासरावांना नेहमीच अवघडल्यासारखे वाटायचे. त्यामुळे विलासराव एकदा शरद पवारांना म्हणाले देखील, “आपण माझ्याकडे येण्याऐवजी मीच आपल्याकडे येईल आपण सिनियर आहात.” त्यावर पवार त्यांना म्हणाले की, “राजकारणात सीनियर जुनियर असे काही नसते, कामाला महत्त्व आहे.”
विलासराव सांगतात की, “विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार त्यांची भूमिका पार पाडत होते. त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणूनही मी काम केले. मंत्री म्हणून काम करीत असताना आणि ते मुख्यमंत्री असताना मनावर कधीच दडपण नव्हते. मंत्री म्हणून मी घेतलेला कोणताही निर्णय त्यांनी कधी फिरवला नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांची मध्ये मंत्रिमंडळावर कधीच लादली नाहीत. संघटनेतून ते मोठे झाले असल्यामुळे माझ्या आणि त्यांच्या वयात पाच वर्षांचे अंतर असले तरी पुढच्या पन्नास वर्षांत कार्यकर्त्यांनी शिकावे, असे अनेक गुण शरद राव यांच्या ठिकाणी आहेत. काँग्रेस पासून ते दूर झाल्यापासून सुद्धा सामाजिक प्रश्नावर चर्चा करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा कोणताही भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. उमद्या मनाचा एक नेता असेच त्यांचे वर्णन मी करू शकेन”. असे म्हणत विलासरावांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांबद्दलचा आदर व्यक्त केला होता.