सिरमने जाहीर केले कोविशिल्ड लसीचे दर; जाणून घ्या किंमत

पुणे : १ मे पासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने आज महत्वाची घोषणा केली आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढविणार असल्याचे सांगत नवीन दर जाहीर केले आहेत. तसेच भारतात इतर देशातील दरापेक्षा कोविशिल्डचे दर कमी राहतील याची काळजी घेण्यात आली आहे.
सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या सहीने एक पत्र काढण्यात आले असून ते ट्वीट करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीच्या निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्याला ५० टक्के लस खुला बाजारात विक्री करायला परवानगी दिली आहे. याला अनुसरून सिरमने आपले उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिन्यात उत्पादन वाढवून लसीच्या तुटवड्याच्या समस्येवर मत करू असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ५० टक्के लास भारत सरकार आणि उर्वरित ५० टक्के लस राज्य सरकार व खासगी रुग्णालयाला दिली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे सिरमने लसीचे दर निश्चित केले आहे. त्याप्रमाणे राज्य सरकारला कोविशिल्डसाठी ४०० रुपये मोजावे लागणार आहे. खासगी रुग्णालयांना प्रत्येक डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहे. अमेरिका, रशिया व चीन मधील लसीच्या तुलनेत भारतात कोविशिल्ड स्वस्त असल्याचे सिरमने ,म्हटले आहे. भारता बाहेरील लसीचे खुला बाजारातील दरही पत्रात नमूद केले आहे.