मनसुख हिरेन प्रकरणी फडणवीसांचे गंभीर आरोप
मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणी विधीमंडळात आज मोठा गोंधळ पहायला मिळाला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेनप्रकरणी घणाघाती टीका केली. फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी सभागृहात केली आहे. हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीचाही दाखला त्यांनी यावेळी दिला. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आलेली नाही? अशी विचारणा करताना कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी माझे पती घरी आल्यानंतर ते सचिन वझे यांच्यासोबत मुंबई येथे गेले होते आणि त्यांच्या सांगण्यावरुन वकील गिरी यांच्याकडून पोलीस आणि मीडियामधून फोन येत असल्याची तक्रार करण्यास सांगितलं. माझ्या पतीकडे पोलिसांनी काही मारहाण केली का? काही त्रास दिला का? याबाबत विचारणा केली होती. यावर त्यांनी कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही असं सांगितलं. पण चौकशी झाल्यानंतरही पोलीस वारंवार फोन करत असल्याने तक्रार दिल्याचं सांगितलं अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोण आहेत सचिन वाझे ?
२ डिसेंबर २००२ मध्ये मुंबईतील घाटकोपरमध्ये बॉम्बस्फोट झाला. याप्रकरणी परभणीत एका २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक करण्यात आली ज्याचं नाव होतं ख्वाजा युनूस. याचसंदर्भातल्या तपासासाठी ख्वाजा युनूसला पोलीस औरंगाबादला घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. पोलीस रेकॉर्डनुसार, ख्वाजा युनूस अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता पण त्याच्या कस्टडीतील इतर कैद्यांनी आरोप केला होता की क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी युनूसला कपडे काढून त्याला रक्त येईपर्यंत मारलं होतं. युनूसच्या घरच्यांनी देखील यानंतर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांवर एन्काउंटर केल्याचा आरोप केला होता. पुरावे नष्ट केल्याचा आरोप असल्यामुळे त्यावेळी ४ पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयाने बडतर्फ केलं होतं. यात प्रमुख नाव ‘ सचिन वाझे’ हे होतं.