‘आमच्या मुलीला परत पाठवा नाहीतर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही’

पुणे: आमच्या मुलीला परत पाठवा नाहीतर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही” असे बोलून अपहरण केलेल्या युवकाची कामशेत पोलिसांनी अवघ्या ५ तासात केली सुटका.
कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव मंगेश भोसले याने गेल्या महिन्यात त्याचे कॉलेज मधील मुलीशी आंतरजातीय प्रेम विवाह केला आहे. मुलीचे नातेवाईकांची सदर प्रेमविवाहाला मान्यता नसल्याने ते वारंवार मुलीला घरी परत ये असा आग्रह करत होते. परंतु मुलीने त्यास नकार दिला होता.
आरोपींनी सोमवार (दि.२९) सात वाजण्याच्या सुमारास दोन फोरव्हीलर घेऊन कामशेत येथे येऊन त्यांनी मुलीचा दिर अभय मंगेश भोसले (वय १८) याचे अपहरण करुन लोणावळा दिशेने पळून गेले व जाताना त्यास” आमच्या मुलीला परत पाठवा नाहीतर तुझ्या भावास जीवंत सोडणार नाही” असे म्हणुन त्यास मारहाण करुन त्याचा मित्र जय मिरकुटे याचा मोबाईल घेवून ते लोणावळ्याच्या दिशेने निघून गेले. याबाबत शुभम मंगेश भोसले (वय २४) यानी कामशेत पोलिसांना माहिती दिली.
त्यानुसार कामशेत पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे व स्टाफसह पोलीस लोणवळ्याच्या दिशेने पाठलाग सुरु केला. सदर घटनेची माहीती तत्काळ पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख व सहा पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग नवनीत कावत यांना दिली व नियंत्रण कक्षास माहीती देऊन पुणे, लोणावळा व मुंबई दिशेकडील सर्व टोल नाक्यांवर अपहरण करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी लोणावळा विभागातील सर्व पोलीस स्टेशनची पथके तत्काळ शोधासाठी रवाना केली. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी कडून मारुती स्वीफ्ट डिझायर कार (नं. के ए २९ एन १०९३) या वाहनातून आरोपींनी पलायन केल्याची माहीती सर्वांना कळविली.
त्या अनुषंगाने लोणावळा वरसोली टोलनाका येथे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक लवटे व त्यांच्या स्टाफने सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता अपहरण कर्त्यांनी टोलनाक्यावरील बॅरीयर उडवून न थांबता लोणावळा दिशेने पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक लवटे व त्यांच्या स्टाफने सदर वहानाचा पाठलाग सुरु केला परंतु काही अंतर पुढे गेल्यावर अपहरण कर्त्यांनी अंधाराचा फायदा घेवून त्यांची गाडी लोणावळ्यातील अंतर्गत रस्त्यांवरून तुंगार्ली परीसरात अज्ञात ठिकाणी पोबारा केला.
त्यानंतर नवनीत कावत यांचे मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप, सुरेखा शिंदे, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, लवटे व लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफ असे यांनी तुंगाली परीसरात शोध मोहीम सुरु केली. अखेर रात्री १० वाजण्याच्या सुमारास अहपहरणकर्त्यांचे वाहन सापडले.
यावेळी पोलिसांनी आरोपी अल्ताफ रुस्तम शेख (वय २४, रा, शिरापुर ता. मोहोळ जि. सोलापुर) सिद्धराम अमसीद बिरादार (वय २३ रा, गोविंदपुर ता. इंडी जि. विजापुर कर्नाटक) शरमतरबेज ख्वाजासैरनमुलक मुल्ला (वय २४) रा. उंब्रज ता, चडचन जि. विजापुर कर्नाटक) यांना ताब्यात घेतले.
यावेळी आरोपींची कसुन चौकशी केली असता त्यांनी अभय भोसले याला त्यांचेसोबत असलेल्या दुसऱ्या वाहनाने त्यांचे तिन साथीदार पुणे येथे घेऊन गेल्याचे सांगीतले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी करुन पिडीत मुलगा अभय भोसले याचेबाबत माहीती घेवून ती माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांना देऊन त्यांना विमाननगर पुणे येथे पथकासह पाठविले. त्या पथकाने आरोपींचे संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून अपहारीत मुलगा अभय भोसले यास ताब्यात घेतले आहे.