Friday, October 7, 2022
HomeZP ते मंत्रालयगझलेवर कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही म्हणत; 'गझलसम्राट'

गझलेवर कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही म्हणत; ‘गझलसम्राट’

स्वागतासाठी माझ्या भुंकले ते आदराने

थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!  – सुरेश भट

सुरेश भट! हे नाव जरी उच्चारले तरी त्यांच्या सर्वं गझला नजरेसमोरून जातात. सुरेश भट यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. सुरेश भट यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत भन्ते सुरई ससाई यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली होती. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

थोडक्यात गझल काय चीज आहे, हे महाराष्ट्राला कळले ते सुरेश भट यांच्यामुळे. आता-आता महाराष्ट्रात गझल हा काव्यप्रकार आपल्या अंगभूत शक्तीमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागलेला आहे. आता नव्या दमाचे तरुण पिढी गझलेकडे वळू लागलेली आहे. परंतु दुर्दैवाने गझलेची पुरेशी किंवा मुळीच माहिती नसल्यामुळे कोणतीही रचना अनेकदा गझल म्हणून सादर केली जाते. भट म्हणतात की, गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार असल्यामुळे गझल लिहिणारा आधी उत्तम कवी असला पाहिजे ही गझलेची पूर्वअट आहे. कोणीही स्वतःला ‘परफेक्ट’ समजू नये. आपल्या भोवतीची ही दुनिया आणि आपले जगणे सापेक्ष आहे. ज्याला करिअरसाठी गझल लेखन करायचे असेल त्यांनी हा काव्यप्रकाराच्या वाटेला जाऊ नये. एवढाच माझा सर्व लोकांना प्रेमाचा सल्ला आहे. कारण हा कधीही न संपणारा जीवघेणा काव्यप्रकार आहे.

भट साहेब नेहेमीच म्हणत, “मी सुरेश भट म्हणजेच माझ्या गझलांनी, मराठी कवींची एक पिढीच बरबाद केली असे काही इंटरनॅशनल विद्वान प्राध्यापकांचे म्हणणे आहे. यावर माझे म्हणणे असे आहे की, काही सन्माननीय अपवाद वगळता. आजपर्यंत मराठीच्या प्राध्यापकांनी मराठी भाषा, मराठी साहित्य व मराठीचे विद्यार्थ्यांचे जेवढे नुकसान केलेले आहे. तेवढे नुकसान कोणत्याही विदेशी आक्रमकनाने केलेले नसेल. विद्यार्थ्यांवर प्रेम न करणे, वर्गाला दांड्या मारणे, अभ्यासक्रम कधीही वेळेवर पूर्ण न करणे, हरामाचा पगार खाणे आणि वर्षानुवर्षे एकाच गावाला घट्ट चिकटून राहणे एवढेच दर्जेदार काम मराठीच्या बहुसंख्य प्राध्यापकांनी केलेले आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढी यापुढे अधिकाधिक उत्कृष्ट व निर्दोष मराठी गझला लिहिल्या जातील, अशी मी आशा बाळगतो.”

गझलेचा विचार करताना आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, ज्याप्रमाणे मोटारकारची यंत्र रचना कोणत्याही देशाच्या मालकीचे नसते, तसेच गझल हा काव्यप्रकार कोणत्याही भाषेच्या मालकीचा नाही. गझल अरबीतून फारसीत आली. फारसी भाषिक इराणी यांनी खऱ्या अर्थाने तिचा विकास केला आणि मग सुमारे चार हजार वर्षांपूर्वी बाल्यावस्थेत उर्दू भाषेत फारसीतून गझल आली. आज तुर्की, पंजाबी,सिंधी,बस्ती,हिंदी आणि हिंदीच्याच बोलभाषा असलेल्या अवधी, व्रज, भोजपुरी इत्यादींमध्ये गझला लिहिल्या जात आहेत. आणि आता महाराष्ट्रानेही उशिरा का होईना पण गजलेचा स्वीकार केलेला आहे

मराठी गझलेचा विचार करताना उर्दू भाषेतील ‘नजाकत’ मराठीत येऊच शकत नाही असे म्हणणारे काही लोक आढळतात. आणि फार तर देवनागरी लिपी पुरताच उर्दू काव्य शी संबंधित असलेले अनेक महाभाग मराठी गझलेला उर्दू गजलेची भ्रष्ट नक्कल म्हणतात. परंतु सुरेश भट साहेबांचे काव्यसंग्रह आणि गझल संग्रह वाचल्यानंतर हा आरोप कितपत खरा आहे हे मराठी रसिकांनी ठरवावे.

वास्तविक मराठी भाषेला नजाकततिची गरजच नाही. ज्यावेळी उर्दूचा जन्मही झालेला नव्हता, त्यावेळी मराठीत ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यासारखी ग्रंथ लिहिले गेले. उर्दूत कशाला जगातील कोणत्याही भाषेत मराठी भाषेला नजाकत देण्याचे सामर्थ्य नाही.  भट साहेब म्हणतात, “आपल्याच मायबोलीचे सामर्थ्य आम्हाला ठाऊक नसते हे आमचेच करंटेपण आहे. वाचायला आणि ऐकायला लुसलुशीत वाटणारा शब्द वापरण्याची एक शब्दखोर सवय आम्हाला जडलेली आहे, म्हणून आम्ही मराठी भाषा वळवू शकत नाही. जे सांगायचे आहे ते आणि तेवढेच नेमके सांगू शकत नाही. आणि मग एकमेकांच्या पाठीत थोपटणे किंवा थोपटवून घेण्यापलीकडे आम्ही काहीही करू शकत नाही.”

पण कवी पेक्षाही सामान्य मराठी माणसाची भाषा अधिक समृद्ध असते. मानवी संवेदनामुळे होणारी त्याची प्रतिक्रिया अधिक तीव्र, सहज व प्रामाणिक असते. त्याची शब्दांची जाण अधिक सूक्ष्म व प्रखर असते. हा  माझा स्वतःचा अनुभव आहे आणि कित्येक वर्षांपासून मी हे अनुभवले आहे की, आपल्या भावना संवेदना आणि सुखदुःखे मराठीसारख्या मराठी भाषेत नेमक्या अचूक प्रभावी शब्दात भरून दाखविणाऱ्या कवीचे मराठी माणसे नेहमीच स्वागत करतात” असे भट म्हणतात.

कशास व्यासपीठ पाहिजे तुला?

घराघरात गीत गुणगुणून जा

कशास पाहिजे तुला परंपरा?

तुझीच तू परंपरा बनून जा

अशाप्रकारे, मराठी गझल या साहित्यप्रकाराला सर्वसामान्य रसिकांपर्यंत पोहोचविणारे ‘गझल सम्राट’ कवी सुरेश भट यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments