सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी बडतर्फ

मुंबई: सचिन वाझे यांचे साथीदार रियाज काझी यांना मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी काझींना एनआयएने अटक केली होती. त्यानंतर काझींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
रियाज काझी यांची अनेक वेळा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने रियाझ काझी यांचीही चौकशी केली होती. वाझेंच्या अटकेपासूनच काझीही एनआयएच्या रडारवर होते. स्फोटक प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे रियाज काझींना अटक केल्याची माहिती आहे.
कोण आहेत एपीआय रियाझ काझी?
रियाझ काझी हे २०१०च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी २०१० सालच्या १०२ व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.
पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकात करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेंनी सीआययू पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.