Tuesday, October 4, 2022
Homeथेटर ते स्टेडीयमसचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

मुंबई: काही दिवसापूर्वी सचिनने रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेमध्ये भारत लिजंड्स संघाचं नेतृत्व केलं होतं. २१ मार्च रोजी रायपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केलं होतं.

या मालिकेनंतर भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली होती. त्याने आपल्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली होती. सचिनने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं असल्याची माहिती दिली आणि घरातील इतर सर्वांच्या कोविड चाचण्या या निगेटिव्ह आल्याचंही ट्वीट करुन सांगितलं होतं.

मात्र आज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सचिन रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे. यासंदर्भातील माहिती त्यानेच ट्विटरवरुन दिली आहे. “माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं सचिनने ट्विट करुन सांगितलं आहे.

सचिन भारत सरकारच्या कोरोनासंदर्भातील जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाला होता. अनेक क्रिकेटपटुंनी मास्क घालण्यासंदर्भात केलेल्या विशेष व्हिडीओमध्ये सचिनसोबत सौरभ गांगुली, राहुल द्रवीड यासारख्या खेळाडूंनी सहभाग घेत जनजागृती केली होती.

विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा

आज २ एप्रिल असल्याने सचिन तेंडुलकरने २०११ साली विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा देणारं एक वाक्यही या ट्विटमध्ये लिहिलं आहे. “सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन,” असं सचिनने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments