शववाहिका व स्मशानभूमीसाठी धावाधाव बंद, पुणे महापालिकेच्या ‘या’ ॲपची होणार मदत!

पुणे : कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर शववाहिका मिळण्यापासून ते अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मिळेपर्यंत नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे विदारक चित्र आहे. राज्यातील महाशहरांपैकी एक असलेल्या पुण्यात कोरोनाने सरासरी दीडशे जणांचा दररोज मृत्यू होतोय. कोरोनाने हाहाकार माजवला असून दररोज मृतांच्या आकड्यात वाढ पहायला मिळतेय. मृतांचे प्रमाण एवढे वाढले आहे की, अंत्यसंस्कारासाठी जागा आणि मृतदेह नेण्यासाठी शववाहिनी मिळत नाहीये. ही समस्या दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने खास ‘कोविड शववाहिनी’ हे ॲप तयार केले आहे.
शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्याचा ताण निर्माण होत असल्याने हे ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे नातेवाईकांची शववाहिका व स्मशानभूमी यासाठी धावाधाव बंद झालीय आहे. या ॲपमुळे कोणत्या स्मशानभूमीत लगेच अंत्यसंस्कार होतील याची माहितीही नातेवाईक, रुग्णालय व शववाहिकेच्या चालकाला मिळणार आहे.
यामुळे स्मशानभूमीतील वेटिंगही कमी होण्यास मदत होणार आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर हॉस्पिटलकडून ऑनलाईन पद्धतीने डेथपास काढला जातो. त्यासाठी आवश्यक ती माहिती त्यात भरण्यात येते. ही प्रकिया पूर्ण झाल्यावर सर्व माहिती शववाहिका ॲपवर उपलब्ध होते. त्यानुसार पालिकेचे कर्मचारीच मृत रुग्णांच्या नातेवाईकाला फोन करुन माहिती देतात. याशिवाय एसएमएसद्वारे ही त्या नातेवाईकाला शवाहिकेचा नंबर, चालकाचा नंबर स्मशानभूमी, वेळ कळवली जाते. मृतांची संख्या वाढत असताना हेल्पलाईन उपयोगी ठरत नसल्याने नातेवाईक, रुग्णालयातील कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने हे ॲप तयार केले आहे.