राज्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक

केंद्राकडून पथक येणार
नवी दिल्ली: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे पथक तत्काळ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना सर्वेक्षण, नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हे पथक येत आहे.
केंद्र सरकार तर्फे पाठविण्यात येणारे हे पथक राज्यातील कोरोना रुग्णालयांची पाहणी करणार आहे. रुग्णांच्या संख्येतील वाढ होण्यामागचे कारण शोधण्याच्या हेतूने ही पहाणी होणार आहे. यामुळे राज्यातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात येईल असा विश्वास वर्तवला जात आहे. महारष्ट्राप्रमाणे पंजाबमध्ये देखील कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून पथक पाठविण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्या पाहता अमरावती, यवतमाळ, अकोला आदी जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केले आहे. उर्वरित राज्यातही कोरोनाचे रुग्ण अधिक आढळत असल्याने काही महानगरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसाला सरासरी ८ ते ९ हजार रुग्णांची नोंद होत आहे. ही बाब चिंताजनक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. तसेच, जर नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन लावावे लागेल अशी ताकीद दिली होती.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून त्यानंतर राज्यभरात कडक नियम लागू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून तेथे लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर केंद्राचे पथक येऊन गेले होते. राज्य सरकारने केलेल्या कामांची प्रशंसा केली होती व काही उपाय सुचवले होते.
आता येणारे केंद्रीय पथक कशाप्रकारे सूचना देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.