रेमेडिसीवीर इंजेक्शन येत्या १७ ते २० एप्रिल दरम्यान राज्यात उपलब्ध होणार – डॉ. तात्याराव लहाने

राज्याच्या कोविड-१९ टास्क फोर्सकडून रुग्णांना दिलासा
मुंबई: देशभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने यंत्रणेवरील ताण वाढत आहेत. त्यात रेमेडिसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. दरम्यान राज्याच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
येत्या १७ ते २० एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात राज्यात रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध होतील, असा दिलासा डॉ. लहाने यांनी दिला आहे. त्याशिवाय रेमेडिसीवीरचा काळाबाजार होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी सजग आहेत. याच्या किंमतीवर राज्यसरकार नियंत्रण आणू शकणार नाही, हे ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाच्या म्हणजेच केंद्राच्या अखत्यारीत येतं. रेमेडिसीवीर १७ तारखेनंतर मिळायला सुरुवात होईल आणि २० एप्रिलपर्यंत लोकांची तक्रार राहणार नाही असा विश्वास राज्याच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला.
सध्या मोठ्या प्रमाणात RTPCR चाचण्या केल्या जात आहे. त्यामुळे खासगी लॅबवरील ताण वाढला आहे. त्यामुळे अनेकांना कोविडचे रिपोर्ट उशीरा मिळत आहे. मात्र सगळ्या लॅबना २४ तासात RTPCR रिपोर्ट देण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. खाजगी लॅब क्षमतेपेक्षा अधिक नमुने घेत आहेत, त्यामुळे २४ तासांत रिपोर्ट देता येत नाहीय. त्यांनी क्षमता वाढवा किंवा क्षमते एव्हढेच नमुने घ्या, असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. RTPCR चाचणी किटच्या ३०० कंपन्या पुरवठादार आहेत आणि यांची किंमत पण १२० रुपयांपर्यंत आहेत. राज्यात या किटची कमतरता नसल्याचं लहानेंनी सांगितलं आहे.
दुसरीकडे डॉ. लहानेंनी नागरिकांना सावध केलं आहे. सध्या पुणे, मुंबई, नागपुरात घरात कोरोनाने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं असून रुग्णालयात आणल्यानंतर पुढील २४ तासांत अनेक रुग्ण दगावल्याचं समोर आलं आहे. हे पडसं-खोकला नाहीये. हा कोविड आहे. एकदा वाढल्यानंतर यावर उपाय नाही. ताप कणकण आली तरी कोविड टेस्ट करा. अनेकांचा रुग्णालयात आणल्यानंतर २४ तासांत मृत्य होतोय. क्रोसीन घेऊन त्रास अंगावर काढू नका. हे धोकादायक आहे, असंही यावेळी लहाने यांनी सांगितलं..