मोफत मिळणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळीमुळे गरीब, गरजू जनतेला दिलासा…

गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात पोषक आणि ताजे भोजन मिळावं हा नेमका उद्देश ठेवून २६ जानेवारी २०२० पासून राज्यात शिवभोजन योजना सुरू झाली. राज्यात शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण झालं असून, ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३ कोटी ५ लाख ३९ हजार ६४४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा अस्वाद घेतला आहे. एक वर्षभरात शिवभोजन योजनेअंतर्गत ९०५ केंद्रं सुरु झालेी असून, योजनेवर आतापर्यंत ८६ कोटी १० लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
महाविकास आघाडी सरकार आणि हे शासन संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत दिलेल्या शिकवणुकीनुसार काम करत आहे. या दशसुत्रीत “भुकेलेल्यांना अन्न” हे एक सुत्र आहे ते डोळ्यासमोर ठेऊन शिवभोजन योजनेची आखणी केली असून शिवभोजन थाळीनं कोट्यावधी लोकांची भूक भागवल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
थोडक्यात या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन १० रुपयांत मिळत आहे. कालच येत्या १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून एक महिनाभर राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत रोज जवळपास २ लाख थाळ्या शिवभोजन मोफत दिलं जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गरीबांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारनं पुढील एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ एप्रिलपासून पुढचा एक महिना दररोज जवळपास २ लाख शिवभोजन थाळी मोफत दिल्या जाणार असल्याची घोषणा त्यांनी. सुरुवातीला १० रुपयांची असलेली शिवभोजन थाळी सरकारनं नंतर ५ रुपयांना केली होती. त्यानंतर आता ही थाळी गरीबांना मोफत दिली जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
कशी आहे योजना?
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिवभोजन योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरात, जिल्हा रुग्णालय, बस स्थानक, रेल्वे परिसर, महानगरपालिका परिसरात एक भोजनालय आहे जिथे शिवभोजन थाळी मिळेल. गर्दीच्या आणि वर्दळीच्या भागात हे भोजनालय असेल अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच भोजनालयातल्या स्वच्छते बद्दल माहिती देताना सांगण्यात आलं कि, भोजनालयात अन्नपदार्थ तयार करण्यासाठी स्वच्छ फिल्टर्ड पाणी वापरले जाईल. भोजनालयात स्वच्छ टेबल आणि खुर्च्या असतील. स्वयंपाकगृहात खाद्यपदार्थ तयार करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
शिवभोजन योजनेतील भोजनालय ही दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु असते. या कालावधीत योजनेतील लाभार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही भोजनालय चालकाची असते, भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींना जेवण्यासाठी बसता यावे अशी व्यवस्था असणार आहे. या एका भोजलनालयात किमान ७५ तर कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध असेल. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर स्टॉल स्वरूपात भोजनालयचालक गरजू लोकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात, पॅकबंद पार्सल ही थाळी दिली जातेय.
प्रत्येक थाळीमागे शहरी भागात ४५, तर ग्रामीण भागात ३० रुपयांचं अनुदान शासनामार्फत केंद्रांना ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिलं जात आहे. योजनेसाठी “शिवभोजन” ॲप तयार करण्यात आले असून त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार झाला आहे. अन्नासाठी कुणीही वणवण भटकणार नाही याची काळजी सरकारने घेतली. कोरोनाचे संकटाला तोंड देण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावावा लागला पण लोकांच्या रोटीची व्यवस्था सरकारने केली. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील जनतेला थाळी वाजवण्याचा टास्क न देता गोरगरिबांना शिवभोजनच्या माध्यमातून थाळी भरून जेवण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गरीब, गरजू जनता नक्कीच समाधानी आहे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर सद्या आघाडी समर्थकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.