अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचे लक्ष, इंधनावरील कर कपातीचे संकेत
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. २०२१-२२ या वर्षाच्या अर्थसंकल्पात आर्थिक स्थिती सावरण्याचे मोठे आवाहन राज्य सरकारवर असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत दरवाढ होत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून करात काही प्रमाणात सूट मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराजे देसाई विधानपरिषदेत दुपारी २ वाजता सादर करणार आहे.
नुकताच सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती समोर आले आहे. विकास दर आठ टक्क्यांनी घटणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्याची महसुली तूट १ कोटी ५६ हजार कोटींवर पोहोचली आहे. हा अहवाल मांडताना अजित पवार यांनी अर्थसंकल्पा कडून फार अपेक्षा ठेवू नये असे सांगितले होते. यामुळे या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणार नसल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलच्या मूल्यवर्धित करात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ केली होती. आता कुरघोडी करण्यासाठी राज्य सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या करात सूट मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंधन दरवाढीवर बोलतांना राज्यांनी आपल्या करात सूट द्यावी अशी सूचना दिली होती. आसामच्या राज्य सरकारने नुकतीच इंधनाच्या करात ५ रुपयांची सूट दिली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणूका लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सादर होणार का हे पाहावे लागणार.