वेळीच ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

Recognize the symptoms of breast cancer in time
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

स्तनाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग. पूर्वी आपल्या देशात गर्भाशयाचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळत होता, मात्र आता ती जागा स्तनाच्या कर्करोगाने घेतलीये. ब्रेस्ट कॅन्सर बाबतच्या जागृतीसाठी जगभरात ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट ‘कॅन्सर अवेअरनेस’ महिना म्हणून पाळला जातो. अधिकाअधिक महिलांमध्ये या आजाराविषयी जागृती निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट. आता हा स्तनाचा कर्करोग कसा होतो? तो कसा ओळखावा? त्याची लक्षणं काय? तर स्तनाच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे एक नवीन गुठळी किंवा गाठ. एक वेदनारहित, कठोर वस्तुमान ज्यास अनियमित कडा असतात त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते, स्तनाचा कर्करोग कोमल, मऊ किंवा गोलाकार देखील असू शकतो. मुख्य म्हणजे पन्नाशी पार केलेल्या स्त्रियांमध्ये हा कर्करोग आढळतो. वाढत्या वयाबरोबर स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.  ज्या महिलांची रजोनिवृत्ती उशिरा होते, अशा महिलांना इतरांच्या तुलनेत या कॅन्सरचा धोका अधिक असल्याचं आढळून आलंय. अधिक चरबीयुक्त आहार, धूम्रपान, मद्यपानासारखी व्यसने त्याला कारणीभूत ठरू शकतात, हे वेगळे सांगायला नको. लठ्ठपणामुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो, हे सुद्धा ध्यानात ठेवायला हवे. सध्याच्या घडीला भारतीय महिलांमध्ये अंदाजे नऊपैकी एकीला हा  कर्करोग होण्याचा धोका असल्याचं सांगितलं जातं.

लक्षणे

1. न दुखणारी गाठ स्तनात तयार होणे .

2. स्तनाग्रातून (निपल मधून) रक्तस्त्राव होणे .

3. काखेत गाठ होणे .

4. स्तनावर जखम होणे .

5. स्तनाच्या त्वचेत बदल होणे .

6. स्तनाचा सर्व भाग किंवा काही भागांना सूज येणे.

7. त्वचेची जळजळ होणे किंवा ओसरणे

8. स्तन किंवा स्तनाग्र वेदना

9. स्तनाग्र (निपल) किंवा स्तनाच्या त्वचेची लालसरपणा, क्षीणपणा किंवा दाटपणा.

१०. निपल आतील बाजूस जाणे.

११. निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येणे.

१२. निपलच्या आजूबाजूला लाल होणं किंवा पुरळ येणं.

वरील पैकी एक अथवा अनेक लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्रेस्ट कॅन्सरचे लवकरात लवकर निदान व्हायला हवे. मृत्यू आणि रोगावर मात यातील मोठा पल्‍ला लवकर निदान झाले, तरच पार करता येतो. आपण काय करू शकतो ? आपण सेल्फ एक्सामिनेशनच्या मदतीने हे अंतर कमी करू शकतो. सेल्फ एक्सामिनेशन कसं करू शकतो ? स्वतःच्या स्तनांची तपासणी कशी करावी ? याबाबत अनेक डॉक्टरांचे लेख आहेत किंवा बरेच ठिकाणी याबाबतची माहिती आपल्याला मिळते. रोगाबरोबरच आपल्याला त्याच्या तपासण्या त्यावर होणारे उपचार याबाबतची माहिती असणं देखील आवश्यक आहे. 

तपासण्या

१. सेल्फ ब्रेस्ट एक्सामिनेशन

ही स्त्रीने स्वतः करायची सर्वात महत्वाची तपासणी आहे. महिन्यात एकदा स्त्रीने स्वतःच स्वतःच्या स्तनाची शात्रशुद्ध तपासणी केली तर कॅन्सर लवकर पकडता येऊ शकतो.

– स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का हे पहाणे.

– स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणे, व्रण आले आहेत का याकडे लक्ष द्या.

– स्तनाग्रांची (निपल) जागा बदलली आहे का हे पाहा?

– निपल आतील बाजूस गेले असतील तर लक्ष देणं गरजेचं आहे.

– निपलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो का याकडे लक्ष ठेवा.

– हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहा

तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाब द्या.

२. मॅमोग्राफी – स्तनात गाढ दिसत नसताना देखील या तपासणीद्वारे आपण कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान करू शकतो. त्यासाठी ४० वर्षावरील स्त्रियांनी वर्षात एकदा मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. बायोप्सी / FNAC – या तपासण्यांद्वारे गाठीतल्या पेशी काढून ती गाठ कॅन्सरची आहे का नाही याची खातरजमा करण्यात येते, ही कॅन्सरसाठीची लिटमस टेस्ट आहे.

४. सी टी स्कॅन / पेट स्कॅन – ह्या आधुनिक तपासण्या कॅन्सर शरीरात किती पसरला आहे, याची कल्पना देतात व आजाराचे योग्य उपचार डॉक्टर करू शकतात.

उपचार

कोणत्याही कॅन्सर प्रमाणेच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये उपचार ३ भागात केले जातात.

१. ऑपरेशन – ऑपरेशनद्वारेस्तनातील गाठ काढण्यात येते. पूर्वीप्रमाणे स्त्रियांचे पूर्ण स्तन काढण्याची गरज आता राहीलेली नाही, स्तन वाचवून देखील डॉक्टर स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर मधून पूर्णपणे बरे करू शकतात, त्याचप्रमाणे आधुनिक प्लास्टिक सर्जेरी द्वारे स्तनाचा आकार देखील पूर्वीप्रमाणे ठेवता येतो.

२. रेडिएशन उपचार –  रेडिएशन हे प्रामुख्याने स्तनात पुन्हा कॅन्सर उद्भवू नये यासाठी दिले जाते त्यामुळे स्तन वाचवून शस्त्रक्रिया करणे आता सहज शक्य झाले आहे.

३. केमोथेरपी – केमोथेरपी ही प्रामुख्याने कॅन्सर शरीरात पसरू नये अथवा पसरला असल्यास त्याला नियंत्रित करण्यासाठी दिली जाते. स्तनाच्या कर्करोगात केमोचे महत्व खूप आहे कारण लाखो स्त्रियांचे प्राण केमोच्या योग्य उपचारांनी वाचवले आहेत. वाढत्या आधुनिकीकरणाबरोबर जगभर तसेच आपल्या देशात स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. पाश्चात्य जगातील हा आजार आज आपल्या देशात हातपाय पसरत आहे. आज जगभर सर्व कॅन्सरमध्ये स्तनाच्या कॅन्सरवर सर्वात जास्त संशोधन चालु आहे.

भारतातील स्त्रियांत इतर देशातील स्त्रियांच्या पेक्षा स्तनाचा कर्करोग कमी वयात आढळतो, त्यामुळे तो जास्त घातक आहे, त्यामुळेच स्वतःच्या आरोग्याकडे डोळसपणाने लक्ष देऊन स्तनाच्या कर्करोगापासून स्वतःला मुक्त करण्याचा ध्यास स्त्रियांनी घ्यावा. योग्यवेळेत उपचार केल्यास जास्तीत जास्त स्त्रिया सुद्धा कॅन्सर पासून मुक्त होऊ शकतात. गरज आहे ते रुग्णाने योग्य वेळात डॉक्टरकडे येण्याची आणि या रोगाबाबतच्या अवेरनेसची.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *