आपले नैतिक कर्तव्य आहे याची जाणीव झाली आणि पोलीस ठाण्यात गेलो; फडणवीसांचा खुलासा

मुंबई : एका फार्मा कंपनीच्या मालकाला सोडविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लेख लिहून फडणवीस हे सत्तेसाठी उतावीळ असल्याची टीका केली होती. रिबेरो यांच्या लेखाला उत्तर देताना त्यावेळी पोलीस ठाण्यात का गेलो होतो त्याचे सविस्तर उत्तर दिले आहे.
ब्रूक फार्मा कंपनीकडे रेमडेसिविरचा साठा असल्याच्या संशयावरून कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतले होते. हे समजताच देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर व भाजपचे स्थानिक नेते मंडळी थेट पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला. याबाबत रिबेरो यांनी लेख लिहून विरोधी पक्षनेत्यावर त्यांच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
फडणवीस म्हणाले, ब्रूक फार्मा कंपनीकडून भाजपने इंजेक्शन मागविले होते. मात्र, त्यातील एकही इंजेक्शन भाजपसाठी नव्हते. एफडीए कडून तशी परवानगी घेण्यात आली होती. मात्र, सरकार मधील एका अधिकाऱ्याच्या ओएसडी कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना फोन केला आणि विरोधी पाक्षांना तुम्ही इंजेक्शन कसे काय पुरवता? असा जाब विचारला. त्यावर हे इंजेक्शन सरकारला देण्यात येणार आहे. अशी माहिती डोकानिया यांनी समोरच्या व्यक्तीला दिली. मात्र, त्याच रात्री पोलीस डोकानिया यांच्या घरी गेले व रेमडेसिविरची मागणी केली. डोकानिया यांनी ते देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा फोन जप्त करण्यात आला. यात काही काळबेर आहे समजताच प्रवीण दरेकर यांनी मला त्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच मी पोलीस सह आयुक्त यांना दिली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांना फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मेसेज सुद्धा केला. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून राजकीय डाव असल्याचे सांगितले. राज्याला हवी असलेली औषध मिळून देणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे याची जाणीव मला झाली आणि पोलीस ठाण्यात गेलो असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पोलीस ठाण्यात जाण्याआधी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. लपून गेलो नव्हतो. एफडीएची ऑर्डर संबधितांना दाखवली. तो पर्यंत त्यांना माहितीच नव्हते. इतकाच नव्हे तर कंपनीकडे साठा आहे कि नाही हे पण त्यांना माहित नव्हते. पुरावे असतील तर कारवाई करावी अस मी त्यांना सांगितले. असेही फडणवीस यांनी लिहले आहे.