Tuesday, October 4, 2022
Homeराजकीयराणे विरुद्ध केसरकर वाद : आतापर्यंत नेमकं काय झालंय ??

राणे विरुद्ध केसरकर वाद : आतापर्यंत नेमकं काय झालंय ??

युतीच्या किंवा आघाडीच्या सरकारमध्ये मतभेद उफाळून येणे किंवा कुरघोडीचे राजकारण होणे सावभाविकच आहे. एनडीए, युपीए, शिवसेना-भाजप, महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील असेच मतभेद पाहायला मिळाले होते.

महाराष्ट्रात स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे देखील युती किंवा आघाडीच्या सरकारमध्ये मतभेद झाल्याचे दिसून आले आहे. मग याला शिंदे – फडणवीस सरकार कसे अपवाद असेल?

वादाची सुरुवात झाली केसरकर यांच्या वक्तव्यापासून. ते म्हणाले, नारायण राणेंची मुले लहान आहेत आणि त्यांना समजवण्याचे काम हे देवेंद्र फडणवीस करतील. ते काय ट्वीट करतात ते मी वाचत नाही. लहान-लहान मुले ट्वीट करत राहतात.

लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. कोणी गांभिर्याने त्याच्याकडे बघत नाही; पण हे एवढे गंभीर असेल तर मी महाराष्ट्रात गेल्याबरोबर हे फडणवीस यांच्या कानावर घालेल. ते त्यांना समज देतील आणि ते सुधारतील. ते शत्रू थोडेच आहेत.

केसरकरांनी नारायण राणेंची मुले लहान आहेत, अशी टीका करताच माजी खासदार निलेश राणे यांनी केसरकरांना चोख प्रत्युत्तर दिले. ते व्हिडिओ जारी करत म्हणाले,

आमदार केसरकर यांनी राणे व त्यांच्या कुंटुबियांवर बोलून वातावरण खराब करू नये. शिंदे आणी फडणवीस सरकारमध्ये झालेली आघाडी पाळणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता आमचे नाहीत.

तुमचा विषय मतदार संघातून आटपला होता; परंतु आता पुन्हा एकदा तुम्हाला राजकीय जीवदान मिळाले आहे. त्यामुळे जी इज्जत देतो ती घ्यायला शिका आमच्यावर बोलू नका. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमच्याकडुन सावंतवाडी पालिका काढून घेतली हे लक्षात ठेवा.

राणेंची दोन्ही मुले लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. असे तुम्ही म्हणतात तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता आमचे नाहीत. तुमची अवस्था आम्ही मतदार संघात काय केली आहे, हे तुम्हाला माहीत आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमच्या ताब्यात असलेली सावंतवाडी पालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती, आम्ही ताब्यात घेतल्या आहेत.

केसरकर तुमची पात्रता आम्हाला माहित आहे. कशाला उड्या मारताय. तुमच्या मतदार संघात तुमची अवस्था नेमकी काय आहे, हे आम्हाला माहित आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्या मिळाल्यात त्या कुबड्यावर व्यवस्थित चाला.

निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर लगेच केसरकरांनीही पलटवार केला.

ते म्हणाले, राणेंची मुलं लहान आहे. माझ्यापेक्षा निम्म्या वयाची आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा मला अधिकार आहे. त्यांना वडिलकीचा अधिकार कळत नसेल तर काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी कुणाची लायकी काढू नये.

त्यांची लायकी काय आहे हे सात वर्षापूर्वी कोकणच्या लोकांनी दाखवून दिली आहे. ते विसरले नसतील तर कोकणची जनता त्यांना पुन्हा एकदा त्यांची लायकी दाखवून देईल.

हा वाद एवढ्यातच थांबला असता, पण केसरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांच्यावर काही आरोप केले.

ते म्हणाले, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात आली. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत याचा वाटा फार मोठा होता.

ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे लोक यामुळे दुखावले गेले. उद्धव साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यानंतर कुटुंब प्रमुख कसा असावा हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं.

या आरोपामुळे केसरकर यांनी वाद ओढवून घेतला. त्यानंतर त्यांनी सारवासारव करत फिरकी घेतली.

ते म्हणाले, आता मी नारायण राणे यांचा उल्लेख करणार नास्लायचे सांगत नारायण राणे आणि माझा वाद संपूर्ण वाद महाराष्ट्राला माहिती आहे. तो लढा संपला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नारायण राणे यांच्याविषयी तक्रार केली नव्हती.

व्यक्तिगत तक्रारी कोणी ऐकून घेत नसतं, प्रश्न हा सिद्धांतांचा असतो. ठाकरे कुटुंबाची बदनामी होणं योग्य आहे की अयोग्य आहे असं विचारल्यास कोणीही अयोग्य आहे असं म्हणेल. जे अयोग्य असेल ते पंतप्रधान महोदयांर्यंत पोहोचवणं यात चुकीचं काहीच नाही. मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, असेही केसरकर म्हणाले.

त्यावर ट्वीट करत निलेश राणेंनी केसरकरांवर ‘प्रहार’ केला.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.

राणेंनी केसरकरांचे वस्त्रहरण केले असल्याने ते गप्प बसतील, असे वाटत नाही. पण राणे विरुद्ध केसरकर वादामुळे शिंदे- भाजप मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा संदेश जाऊ शकतो. आणि यावरून सरकारवर विरोधक लक्ष करू शकतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments