|

रामदास आठवलेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

नवी दिल्ली: परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बने महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ माजलीये. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे वारंवार गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात बोलताना चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणीही राजीनामा देणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. विरोधीपक्ष वारंवार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वी आरपीआय नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुद्धा ही मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी आज थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतलीये.  

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. “महाराष्ट्रात परिस्थिती बिघडत असून खूप गंभीर घटना समोर येत आहेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचं काम एक पोलीस अधिकारी करतो. गृहमंत्री सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटी मिळाले पाहिजेत असं सांगतात. पहिल्यांदाच असं होत आहे त्यामुळेच मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे,” अशी माहिती रामदास आठवले यांनी यावेळी दिली.

त्यांनी महाराष्ट्र सरकार कोरोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं असल्याची टीकाही केलीये. “महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्र सरकार करोनाला थोपवण्यात अपयशी ठरलं आहे. मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटलो असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर त्यांनी विचार करु असं सांगितलं आहे,” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी पत्र लिहिलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये १०० कोटींच्या प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे. जिथे जिथे भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे असं मतंही रामदास आठवलेंनी एएनआय शी बोलताना व्यक्त केलं.

महाविकासआघाडी आणि राज्यपाल भेट लांबणीवर

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकासआघाडी सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार होते. यावेळी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींसंदर्भात महाविकासआघाडी सरकारकडून स्वत:ची बाजू मांडली जाणार होती. मात्र, राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले आहे. ते २८ मार्चपर्यंत देहरादूनमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांना आणखी काही काळ राज्यपालांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागणार आहे. यावरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *