इच्छुकांनी १० लिटर दूध न थकता काढून दाखवा, राजू शेट्टींची अनोखी मागणी.
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. कुणी प्रत्यक्ष तर कुणी छुप्या पद्धतीनं आपली रणनिती आखत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत आकर्षणाच्या ठिकाणी दोनच नेते आहेत. एक म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि दुसरे म्हणजे २५ वर्षे गोकुळवर वर्चस्व ठेवलेले महादेवराव महाडिक. गोकुळमधील विरोधक एक एक नेता विरोधी पॅनलमध्ये म्हणजे राजर्षी शाहू विकास आघाडीत घेत आहेत. तर सत्ताधारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली सत्ता भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
गोकुळ दूध संघावर गेली २५ वर्षे एकहाती सत्ता असलेल्या महादेवराव महाडिक यांच्यासमोर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी थोडक्यात हुकलेली सत्ता यावेळी कोणत्याही परिस्थितीत मिळवायचीच असा चंगच सतेज पाटील यांनी बांधलाय. त्यामुळे गोकुळच्या या राजकीय कुस्तीत आता रंग भरायला सुरुवात झाली असून त्याचा धुरळा पार मंत्रालयापर्यंत उडाल्याचं दिसतोय.
जिल्ह्यात गोकुळच्या माध्यमातून दूध संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय कुस्ती सुरु झाल्याचं पहायला मिळतंय. या कुस्तीत कोणता पहिलवान कोणत्या गटाचा हे आतापर्यंत बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे. आता या रणधुमाळीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळ निवडणुकीसाठी इच्छुकांनी किमान १० लिटर दूध न थकता काढून दाखवावे अशी अनोखी अट घालण्याची मागणी केली आहे.
ज्यांना गोकुळची निवडणूक लढवायची आहे, त्यात भाग घ्यायचा आहे, त्यांनी न दमता किमान १० लिटर दूध काढून दाखवावे अशी एक अट घालावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. अशी जर अट घातली तरच गोकुळ हा दूध संघ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा राहिला असंही राजू शेट्टी म्हणाले.