PV Sindhu: पहाटे 3 पासून सुरू झालेला प्रवास ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलाय, आता…

PV Sindhu
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

एखादी गोष्ट खरंच मनापासून करायची असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर देव देखील साथ देतो, असा शब्द प्रयोग प्रचलित आहे. आयुष्यात नाव मोठं करायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, याचं खरंखुरं उदाहरण म्हणजे पी व्ही सिंधू (PV Sindhu)…

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आज 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. 5 जुलै 1995 साली आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये सिंधूचा जन्म झाला. पुसरला वेंकट सिंधू असं पी व्ही सिंधूचं पुर्ण नाव. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. सिंधूला लहानपणापासून खेळण्याची खूप आवड. तसा तिला वारसाच लाभला होता.

वयाच्या 8 व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळण्यास सुरूवात केली. सिंधूचे आईवडिल व्हाॅलीबाॅलपटू होते. तिचे वडील पी. व्ही रामण्णा आणि आई पी विजया हे दोघांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत व्हॉलीबॉल खेळले आहेत. त्यामुळे सिंधूला लहानपणापासून खेळण्याबाबत प्रोत्साहन मिळालं.

सिंधू होणं सोपी गोष्ट नाही…

मेहनत घेण्याची तिची तयारी देखील होती. कोचिंग कँप घरापासून 56 किलोमीटर लाॅब असायचा. तरीही तिने कधी कंटाळा केला नाही. पहाटे तीनला उठून सिंधू ट्रेनिंगला जायची. त्यामुळे ती ट्रेनिंगसाठी ग्राऊंडवर अगदी वेळेवर पोहचायची. खेळाबद्दलची आवड तिला मेहनत घेण्यास प्रोत्साहन करायची.

पहाटे साडेचारपासून प्रशिक्षण सुरू व्हायचं. पुर्ण शारिरीक कष्टानंतर ती सकाळी साडेआठला शाळेत जायची. शाळेतून आल्यानंतर देखील 3 तास सराव सुरू असायचा. याच दरम्यान अनेक स्पर्धेत भाग घेतला आणि अनेकदा विजय देखील मिळवला. सिंधूने अखिल भारतीय रॅकिंग चॅम्पियनशीप आणि सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशीप देखील जिंकली.

या स्पर्धा जिंकल्यानंतर तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळालं. 2009 मध्ये सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने कांस्यपदक पटकावलं. त्यानंतर इराणमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅटमिंटन चॅलेंजमध्ये सिंधूने रजत पदक कमावलं.

सिंधूची कारकिर्द-

2012 मध्ये आशियाई ज्युनियर चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक आणि 2013 मध्ये सुवर्णपदक देखील पटकावलं. 2013 मध्ये सिंधूने मलेशिया ओपनमध्ये सहभाग नोंदवला. त्यावेळी तिने मलेशिया ओपनची स्पर्धा जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यावेळी पहिल्यांदा सिंधू नावाची ओळख देशाला झाली.

2015 साली झालेल्या डेन्मार्क सुपर सिरीजमध्ये सिंधू फाॅर्ममध्ये होती. सिंधूने वांग इहान या जगातील नंबर एक खेळाडूचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तिला फायनलच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आणि ती रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.

2016 साली रिओमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यावेळी सिंधू भारतासाठी पदक नक्की पटकावणार, हे निश्चित मानलं जात होतं. सिंधूने देखील अपेक्षा भंग केला नाही. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली.

2020 साली झालेल्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने निराश न करता कांस्यपदकाची कमाई केली आहे. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू राहिली आहे. 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2020 मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पडद्यामागची सिंधू

सिंधू आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देते. पण खाण्याची तिला भरपूर आवड. चायनिज, बिर्याणी आणि इटालियन पदार्थ तिला आवडतात. अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचबरोबर सिंधूला फिरण्याची देखील आवड आहे. हृतिक रोशन, महेश बाबू हे सिंधूचे आवडते कलाकार.

एखादं स्वप्न उराशी बाळगणं, त्या स्वप्नांसाठी धडपड करण्याची तयारी ठेवणं, सरावात सातत्य असणं आणि अखेरच्या क्षणापर्यंत लढा देण्याची तयारी ठेवणं, हेच सिंधूच्या यशाचं गणित आहे. वयाच्या 27 व्या वर्षी किर्ती मिळवणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. कोणी एका रात्रीत स्टार होत नाही, त्यासाठी जिद्द आणि चिकाटीची गरज असते, हे सिंधूने दाखवून दिलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि कांस्यपदक पटकवण्यात सिंधूला यश आलं आहे. पण ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक मिळवावं, अशी सिंधूची इच्छा आहे. त्यासाठी ती आज देखील मेहनत करताना दिसते. दररोज 4 तास मैदानावर सराव करते. आगामी काळात सिंधू देशासाठी सुवर्णपदक पटकावेल, असा सर्वांना विश्वास आहे.

हे देखील वाचा की-


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *