चेन्नई सुपर किंग्स की पंजाब किंग्स? IPL लढतीत आज कोण मारणार बाजी?

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स आणि लोकेश राहुलचा पंजाब किंग्स या संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगेल. चेन्नईला यंदाच्या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. त्यांचा दिल्ली कॅपिटल्सने ७ विकेट राखून पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईचे पहिल्या विजयाची नोंद करण्याचे लक्ष्य असेल. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली होती. सुरेश रैनाने चेन्नईच्या संघात पुनरागमन करताना ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली होती. तसेच मोईन अली (३६), सॅम करन (३४) आणि रविंद्र जाडेजा (नाबाद २६) यांनी फटकेबाजी केली होती. त्यामुळे त्यांचा चांगला खेळ सुरु ठेवण्याचा प्रयत्न असेल.
पंजाब किंग्सने यंदाच्या सलामीच्या लढतीत राजस्थानला पराभूत करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. त्यांच्याकडून कर्णधार राहुल (९१), दीपक हुडा (६४) आणि क्रिस गेल (१४) यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. तसेच गोलंदाजीत युवा अर्शदीप सिंगने ३ विकेट घेतल्या. त्याला मोहम्मद शमीने २ विकेट घेत उत्तम साथ दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात हे खेळाडू चांगली कामगिरी सुरु ठेवतील अशी पंजाबला आशा असेल.
आतापर्यंत झालेल्या IPL च्या सर्व सामन्यांचा विचार करायचा झाला तर चेन्नई विरुद्ध पंजाब आजवर म्हणजेच २००८ ते २०२० पर्यंत २३ सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी १४ सामने जिंकण्यात चेन्नईला यश आलं आहे.
IPL च्या चौदाव्या हंगामातील ८ वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब सोबत वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी ७.३० वाजता सामना होत आहे.
कॅप्टन कूल धोनीला पहिल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. आता पंजाब संघाला पराभूत करून विजय कसा मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सामना होणार आहे.