पुणे व्यापारी महासंघाचा ठाकरे सरकारला हायकोर्टात जाण्याचा इशारा

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून लावलेल्या व्यापारबंदीच्या कठोर निर्णयांविरोधात व्यापारी महासंघानं कोर्टात रीट याचिका दाखल करण्याचं वक्तव्य केलं आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनीच तसे संकेत दिले आहे.
‘कोरोना रोखण्यासाठी पूर्ण लॉकडाऊन करायला आमची अजिबात हरकत नाही पण एकीकडे संचारबंदी म्हणायचं आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली निम्या सेवा सुरू ठेवायच्या, अशाने कुठे कोरोना आटोक्यात येणार आहे का? असाही सवाल रांका यांनी सरकारला विचारला. राज्य सरकारने आमच्या मागण्यांवर विचार केला नाही तर येत्या दोन दिवसात हायकोर्टात आव्हान देणार’, असा इशाराही फत्तेचंद रांका यांनी दिला.
‘अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली एकट्या पुण्यात १५ हजार दुकानं संचारबंदीतही खुली राहणार, मग कोरोना कमी कसा होणार? लॉकडाऊन फक्त व्यापाऱ्यांसाठी आहे का? संचारबंदी केली मग शिवथाळी आणि रिक्षाला कशी परवानगी देता? हा दुजाभाव नाही का? कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर पूर्ण लॉकडाऊन केलं पाहिजे. पण सरकारने तसं न करता नुसताच घोळ घालून ठेवला आहे, कुणालाच काही समजत नाही’, असंही रांका म्हणाले.
गोरगरिबांना मोफत शिवभोजन, फेरीवाल्यांना आर्थिक मदत मग आमच्या कामगारांनी काय केलं. त्यांनाही फेरिवाल्यांप्रमाणेच आर्थिक मदत द्या, ते पण गरीबच आहेत, अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या झूम मिटिंगमध्ये मांडली गेली. राज्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच सरकारी आदेशाविरोधात हायकोर्टात जाण्याचा अंतिम निर्णय घेणार असल्याचं रांका यांनी सांगितले.