प्रमोशन की डिमोशन ; प्रभारींच्या नियुक्त्यांमागंच राजकारण काय ??

पंकजा मुंडे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने मराठी माणसाने देशाचे सर्वोच्च पद भूषविले. यशवंतराव चव्हाण पंतप्रधान व्हावेत, ही तमाम मराठी जणांची इच्छा होती. पण नियतीला ते अमान्य होते. त्यामुळे यशवंतरावांना उप पंतप्रधान पदावरच समाधान मानावे लागले.

यशवंतरावांपाटोपाठ शंकरराव चव्हाण, शरद पवार, प्रमोद महाजन, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, नितीन गडकरी या दिग्गजांनी दिल्लीच्या राजकारणात जम बसविला.

महाराष्ट्रातील नेते नेहमीच दिल्लीतील सत्तेच्या पडछायेत वावरले. संघटनात्मक पातळीवरही मराठी माणसाने छाप सोडली. गडकरींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळून पक्षाला मजबुती दिली.

आज कॉंग्रेस जरी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडत असली, तरी मुकुल वासनिक यांच्या रूपाने मराठी माणूस कॉंग्रेसला उभारी मिळवून देण्यासाठी राहुल गांधींसोबत खांद्याला खांदा लाऊन लढतोय.

दिल्लीच्या राजकारणात मराठी बाणा जिवंत ठेवणाऱ्या नेत्यांची उजळणी करण्याचे कारण एवढेच की, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर मिळालेली संघटनात्मक जबाबदारी.

मागच्या काही दिवसांपूर्वीच भाजपने राष्ट्रीय पातळीवर पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. राज्यांच्या नवीन प्रभारींची घोषणा केली आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश जावडेकर आणि विजया रहाटकर यांच्यावर प्रभारी तसेच सह प्रभारी पदाची जबाबदारी दिलेली आहे.

पण या चार नेत्यांचे प्रमोशन झालेय की डिमोशन हाच प्रश्न आहे. म्हणून प्रभारींच्या नियुक्त्यांमामागील राजकारण समजून घेणे गरजेचे आहे.

विनोद तावडे – बिहार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी नाकारल्याने विनोद तावडे यांच्या राजकारणाला मोठा बसला होता. पुढे २०२० मध्ये थेट भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली. त्यानंतर हरियानाच्या प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती. चंदिगढमध्ये भाजपचा महापौर बनविण्याची किमया त्यांनी केली.

भाजपच्या ‘राष्ट्रपती निवडणूक व्यवस्थापन समिती’त विनोद तावडे यांची निवड झाली होती. त्यावेळी सहसंयोजकाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

काल झालेल्या घोषणेनुसार तावडे यांच्यावर बिहारची कमान दिली गेली आहे. आता ते बिहारचे प्रभारी म्हणून काम पाहतील.

हरयाणाचे प्रभारी असताना तावडेंचा दिल्लीच्या राजकारणात वावर वाढला होता. त्यामुळे बिहारच्या जबाबदारीमुळे तावडे दिल्लीपासून दुरावतील, अशी शंका आहे.

शिवाय हरयाणात भाजपची सत्ता होती. आता भाजपने बिहारमध्ये निरीश आणि तेजस्वीसोबत दोन हात करावे लागणार आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासून फारकत घेतल्याने तेथील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

सर्वात मोठा पक्ष असूनही बिहारमध्ये भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले आहे. येत्या काळात बिहारमध्ये भाजपला अच्छे दिन आणण्यासाठी तावडेंना कंबर कासावी लागेल.

पंकजा मुंडे – मध्यप्रदेश

विनोद तावडे यांच्याप्रमाणेच पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला विधानसभा निवडणुकीतल्या पराभावाने ब्रेक लागला. पुढे मुंडेंची राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली.

२०२० मध्ये भाजपने ३६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी पक्षाचे प्रभारी आणि सह प्रभारींची घोषणा केली, तेव्हा पंकजा मुंडे यांच्यावर मध्य प्रदेश सह प्रभारीची जबाबदारी देण्यात आली होती.

दोन वर्षानंतर पुन्हा प्रभारी आणि प्रभारींची नियुक्ती करण्यात आली असून पंकजा मुंडेंवर मध्य प्रदेशची जबबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे. मात्र, मुंडेंचे प्रमोशन करणे भाजप हायकमांडने टाळले आहे. सह प्रभारी म्हणून काम करण्यास त्यांना फारसा वाव नसेल, परिणामी त्यांच्या नेतृत्वावर प्रभारींचा अंकुश असेल.

प्रकाश जावडेकर – केरळ

मागच्या वर्षी मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील पहिल्या मंत्री मंडळाचा विस्तार झाला. त्यावेळी प्रकाश जावडेकर यांना मंत्री मंडळातून डच्चू देण्यात आला.

त्यांनतर ते दिल्लीच्या राजकारणात दिसेनासे झाले होते. आता त्यांच्यावर केरळच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मंत्री पदावरून पायउतार केल्यानंतर जावडेकरांचा राजकीय निरोप राजकीय भाजपकडून निश्चितच करण्यात येईल, असे बोलले जात होते. त्यामुळे केरळचे प्रभारी पद देऊन भाजपने जावडेकरांची राजकीय विदाई तर केली नाही ना ?

विजया रहाटकर – राजस्थान

राष्ट्रीय सचिव असणाऱ्या विजया रहाटकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे. २०२० मध्ये त्यांच्यावर दमण-दीव-नगर हवेली प्रभारी पद देण्यात आले होते.

दरम्यान, राज्यस्थान विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना रहाटकर यांना सह प्रभारी करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या रहाटकर यांचेही प्रभारी पदी प्रमोशन न होता सह प्रभारी पदी निवड केली आहे.

भाजप हायकमांड विरुद्ध वसुंधरा राजे सिंधिया असा वाद असताना सह प्रभारी असणाऱ्या विजया रहाटकर कशाप्रकारे आपल्या कामाची चुणूक दाखवून देतील का ? हे पाहणे महत्वाचे आहे.

हे पण वाचा की :

एका वर्षात कॉंग्रेसने तीन माजी मुख्यमंत्री गमावलेत…


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *