सामाजिक प्रश्नांची कळकळ असणारे प्रा. विलास वाघ यांचे निधन
आंबेडकरी विचारांचे पाईक प्रा. विलास वाघ
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जात आणि वर्गविरहित समाजाच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय उराशी बाळगून प्रा.विलास वाघ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे आयुष्यभर धडपडत राहिले. या कामात येणाऱ्या संकटांना निर्भयपणे तोंड देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इतरांसाठी आधार देणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा लौकिक होता. विलास वाघ यांचे सामाजिक काम चौफेर होते. अशा या परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्याने आज अखेरचा श्वास घेतला. कोरोनानं त्यांचं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांचा जन्म १ मार्च १९३९ मध्ये धुळ्यातील मोराने या गावात झाला. प्राध्यापकाची नोकरी सोडून विलास वाघ यांनी आंबेडकरी विचारांचा प्रसार करण्यासाठी ‘सुगावा’ प्रकाशनाची सुरवात केली. ‘सुगावा’बद्दल बोलताना प्रा. विलास वाघ यांनी सांगितले होते, ‘काही सामाजिक कामे करतात तर काही राजकारणात जातात त्यामुळे मला वाटलं की मी मासिकांमधून आणि प्रकाशन संस्थेच्या माध्यामातून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवून वैचारिक प्रबोधन करू शकेन. त्यामुळे प्रकाशन संस्था सुरु करण्याचा मार्ग मी स्वीकारला. बाबासाहेबांची आधीची प्रतिमा केवळ दलितांचे नेते अशी होती नंतर ती अखिल भारतीय पातळीवर घटनाकार म्हणून झाली पण बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे व अभ्यासाचे अनेक पैलू आजही दुर्लक्षित राहिले आहेत.’ ‘सुगावा’ प्रकाशनाने सुरवातीपासूनच कथा, कादंबर्या प्रकाशित न करण्याचा निर्णय घेऊन केवळ आंबेडकरी विचारधारेतील वैचारिक साहित्यच प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगून ठेवले आहे.
आंबेडकरी विचारांची शंभरपेक्षा अधिक पुस्तक सुगावाने प्रकाशित केली आहेत. सामाजिक कामासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ, जलतज्ञ, नियोजन तज्ञ होते. त्यांच्या या कामगिरीवर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तकं सुगावाने प्रकाशित केली आहेत.
प्रा. विलास वाघ यांनी जातिनिर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन अशी समाजाला उपयुक्त ठरणारी विविध कामं केली.
वेश्यांच्या मुलांसाठीही त्यांनी संस्था सुरू केली होती. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे आणि एका महाविद्यालयाचा डोलारा वाघ यांनी उभा केला होता. विलास वाघ यांच्या निधनामुळं आंबेडकरी विचारांचा सच्चा पाईक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रा.विलास वाघ यांना मिळालेले पुरस्कार:
● ६९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आळंदी येथे यशस्वी प्रकाशक म्हणून पुरस्कार
● दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप
● दलित मुक्तविद्यापीठ गुंटूर आंध्र प्रदेशचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप
● महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार
● औरंगाबाद येथील संस्थेचा लोक कैवारी पुरस्कार
● आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा यांचा सुगावा मासिकाला पुरस्कार
● प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विपू भागवत पुरस्कार
● चार्वाक नागरी पतसंस्था नाशिक यांचा शांताबाई दाणी पुरस्कार
● समता प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे दिनकरराव जवळकर पुरस्कार
● दादासाहेब रुपवते फाउंडेशनचा समाजभूषण पुरस्कार
● पुणे विद्यापीठात आंबेडकर अध्यासनाच्या संचालक पदी नेमणूक
● दया पवार स्मृती पुरस्कार
● पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार
● आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान जळगाव यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित अस्मिता पुरस्कार