प्रकाश आंबेडकरांचा भाजपबरोबर वाद, तरी देणार एकनाथ शिंदेंना साथ?

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीत तास या दोघांमध्ये खलबंत सुरू होती. अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, सर्व पक्षांना घेऊन महाराष्ट्राचा विकास करावा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आहे. आज इंदू मिल असेल किंवा राजगृहाचा मुद्दा आहे. यासंदर्भात ही बैठक झाली असावी. प्रकाश आंबेडर यांनी यापूर्वीच सांगितलं आहे की काँग्रेस हे जळतं घर आहे.
त्यांच्याबरोबर जाण्यापूर्वी आपल्याला विचार करावा लागेल. काँग्रेसने बाबासाहेब आंबेकडकरांना नेहमीच विरोध केला आहे. त्यांच्या विचारापासून काँग्रेस नेहमीच दूर राहिली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या असतात, दोन्ही नेते लवकरच भूमिका स्पष्ट करतील. ही गुप्त बैठक म्हणता येणार नाही. ही वर्षा बंगल्यावर झालेली बैठक आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जोगेंद्र कवाडे यांनी शिंदेंना साथ देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नवीन राजकीय मित्र जोडण्यात यशस्वी होताना दिसून येतायत. याउलट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना देण्यात आला होता.
यावर आंबेडकरांकडून होकार देखील कळविण्यात आला होता. दोन्ही पक्षाच्या युतीबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच ६ डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते यावरुन देखील दोन्ही नेत्यांमधील वाढत्या जवळीकीबद्दल प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आले होते.
तेव्हा आंबेडकरांनी जो पक्ष भाजप सोबत असेल आम्ही त्याच्या सोबत जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन मध्यरात्री भेट घेतल्याने आंबेडकरदेखील शिंदे बरोबर जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात.