शेवटी संजय राठोड आज सर्वांसमोर येणार
यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळे अडचणीत आलेले आणि बऱ्याच दिवसांपासून नॉट रीचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर सर्व माध्यमांसमोर येणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव चर्चेत असून त्यांच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक आहे. गेले १५ दिवस ते गायब होते. तेव्हा आज पोहरादेवी संस्थानाला येऊन ते शक्तीप्रदर्शन करतील याची शक्यता आहे. आज संजय राठोड हे पोहरादेवीच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.तसेच प्रसंगी पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांच्या उपस्थितीत होम हवनाचे आयोजन केले आहे.
मंदिराच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी देखील संजय राठोड यांच्या राहत्या घरी पोहचले आहेत. पोहरादेवी हे संजय राठोड यांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर ते देवीचे दर्शन घ्यायला येतात. पोलिसांनी लोकांना गर्दी न करण्याचे आव्हान केले आहे. तसेच, पंधरा ते वीस हजार लोकांची गर्दी जमण्याची शक्यता पोलसांनी दर्शवली आहे.