पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास काढून घ्यावा
प्रवीण दरेकर, चित्रा वाघ यांची मागणी
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भुमिका संदिग्ध आहे. हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन राज्यातील सक्षम अधिकार्यांकडे सोपवावा अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या कडे केली.
यावेळी वाघ म्हणाल्या, पूजाने उडी मारली, आत्महत्या केली, किंवा तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले. याबाबत पुणे पोलीस काहीही बोलायला तयार नाही. तिच्या सोबत असणाऱ्या दोघांना जुजबी जबाब नोंदवून सोडून देण्यात आले आहे. त्यानंतर ते दोघे फरार आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त यांनी स्पष्टीकरण द्यावे. त्या दोघांपैकी एकही जण पुणे पोलिसांकडे नाही.
घटने नंतर अरुण राठोडच्या मोबाईल मधून १३ ऑडीओ क्लीप मिळाल्या आहेत. त्याच्या मोबाईल मध्ये अजूनही डाटा असण्याची शक्यता आहे. त्याचा मोबाईल पुणे पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. रुग्णालयात पोलिसांच्या चौकशीवेळी अरुण राठोड हे मंत्री संजय राठोड यांच्याशी बोलत होते. रात्री नंतर त्याने कोणाला कॉल केले. त्याला कोणाचे कॉल आले याची माहिती पुणे पोलीस देत नाही. यामुळे पोलीस महासंचालकाकडे पुणे पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मागणी वाघ यांनी केली.