मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला पंतप्रधानांचा हिरवा कंदील!
मुंबई: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या होत्या. त्यात भारत बायोटेकच्या लसीचं तंत्रज्ञान महाराष्ट्राला देण्यात यावं. महाराष्ट्र सरकार त्याचा वापर करून हाफकिनकडून लस निर्मिती करेल. अथवा महाराष्ट्र सरकारच्या सर्व संसाधनांचा वापर करून केंद्रानं सर्व पुरवठा करावा, आम्ही फक्त ‘फिल अँड फिनिश’ करून ते केंद्राला देऊ ही महत्त्वाची मागणीसुद्धा त्यात करण्यात आली होती. या मागणीला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रोजचा आकडा १७ हजारांच्या पार गेला आहे. या वाढत्या कोविड संसर्गाच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी काही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली होती. राज्यात हाफकिनला कोरोना लस उत्पादन करण्याची मान्यता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ व प्रोत्साहन देण्यात येईल असे जाहीर केलंय.
कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली. हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी जेणेकरून लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ दशलक्ष कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशा प्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग व संस्थांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांची क्षमता २४ तास पूर्णपणे कशी वापरता येईल ते पाहण्याचे बैठकीत जाहीर केले.
राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्याजोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.