पंतप्रधान ७ एप्रिलला करणार परीक्षा पे चर्चा!

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुन्हा ‘परीक्षा पे चर्चा’ या खास कार्यक्रमातून तरुणांशी संवाद साधणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. जावडेकर यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘koo’ वरून यासंबंधी माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा २०२१ मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील असं त्यांनी म्हटलं होतं.
‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आगामी परीक्षांचा ताण कमी करण्यासाठी टिप्स देतात. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया पार पडली. यंदाच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावर्षी या कार्यक्रमात पालक आणि शिक्षकही सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या दरम्यान, नववी ते बारावीचे विद्यार्थी ‘परीक्षा पे चर्चा’ २०२१ स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही एका विषयावर अभिप्राय सादर करू शकतात. स्पर्धेतील विजेत्यांना थेट कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी असेल. विजेत्यांना प्रमाणपत्रे प्राप्त होतील.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा २०२१ हा कार्यक्रम बुधवारी ७ एप्रिलला होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ७ एप्रिलला सांयकाळी ७ वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन केलं आहे. यावर्षी कोविड -१९ संक्रमणामुळे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
एका अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, विजेत्यांमधील विद्यार्थ्यांच्या छोट्या गटाला पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची आणि त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल. या विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसमवेत त्यांचा एक स्वाक्षरी केलेला फोटोही मिळेल. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानाच्या संवादाचा कार्यक्रम पहिल्यांदा १५ फेब्रुवारी २०१८ रोजी तालकटोरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. यंदा चौथ्यांदा हा कार्यक्रम होणार आहे.
A new format, several interesting questions on a wide range of subjects and a memorable discussion with our brave #ExamWarriors, parents and teachers.
— Narendra Modi (@narendramodi) April 5, 2021
Watch ‘Pariksha Pe Charcha’ at 7 PM on 7th April…#PPC2021 pic.twitter.com/5CzngCQWwD
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
नरेंद्र मोदी यांनी #ExamWarriors हा हॅशटॅग वापरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचा नवीन प्रकार, विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बुधवारी ७ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम पाहा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.