रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ११ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. जेजे रुग्णालयामध्ये त्यांनी पहिला डोस घेतला. मात्र, काही दिवसांनंतरच रश्मी ठाकरेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
रश्मी ठाकरे यांच्यावर सध्या HN रिलायन्स हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना कोविड संसर्गाची लागण झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनकरून रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रश्मी ठाकरे यांना २३ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे ११ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
आदित्य ठाकरेंनाही कोरोनाची लागण
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच काळात कोरोना विषाणूने थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आदित्य ठाकरे यांनी स्वत:च ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या.