फुले दांपत्याला भारतरत्न द्यावा; पुणे महापालिकेत ठराव मंजूर
पुणे : सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देऊन गौरविण्याची मागणी गेली अनेक वर्षे होते आहे. महात्मा फुले आणि ज्योतिराव फुले यांचे समाजसुधारणेबाबत महान कार्य आहे. त्यांनी आयुष्यभर स्त्रीशिक्षण आणि समाजसुधारणा यासाठी मोठे काम केले. महात्मा फुले यांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षित केले. त्यानंतर पत्नीच्या मदतीने पहिली महिला शाळा काढली. त्यामुळे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा बहुमान सावित्रीबाई फुले यांना जातो. आपल्या एकूण आयुष्यामध्ये या जोडप्याने केवळ समाजसेवा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला. समाजातील विविध अनिष्ठ प्रथा दूर करण्यासठी प्रयत्न केले.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या दांपत्याबाबत पुणेकरांमध्ये आणि एकूणच महाराष्ट्रात प्रचंड आदराची भावना आहे. आज ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करुन ठेवलेले महात्मा फुले यांचे निवासस्थान फुले वाडा आजही पुणे शहरात मोठ्या दिमाखात उभा आहे. पुणे विद्यापीठालाही सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या नावाने शिष्यवृत्तीही देण्यात येते. दरम्यान, फुले दाम्पत्यास अद्याप भारतरत्न मिळाला नाही. याबाबत पहिले पाऊल पडले आहे.
पुणे महापालिकेने एक ठराव मंजूर केला आहे ज्यात त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. हा पुरस्कार देण्याबाबत गेली अनेक वर्षे मागणी होत आहे. समाज सुधारक दांपत्यास भारत रत्न घोषित करण्याचा केंद्र सरकारला आग्रह करण्याचा ठराव काँग्रेसचे नेते उल्हास बागुल यांनी सर्वसाधारण सभेत मांडला आणि सर्व राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने एकमताने तो मंजूर करण्यात आला आहे. हा विनंती ठराव आता राज्य व केंद्र सरकारकडे पाठविला जाईल.
आतापर्यंत, पुणे शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ महर्षि धोंडो केशव कर्वे आणि प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न प्राप्त झाला आहे.