नेटकरी झोमॅटो बॉयच्या बाजूने !
बंगळुरु : ऑर्डर रद्द केली, कंफर्मेशनची वाट पाहतेय असे हितेशाने म्हटल्यानंतर डिलिव्हरी बॉय भडकला. त्याने ऑर्डर रद्द करण्यास मनाई केली. मग त्याने घरात घुसून हितेशाला मारहाण केली. हितेशा चंद्राणीचा यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर तरुणीला मारहाण करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी माफी मागून तिच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याचे झोमॅटोने म्हटलं होतं.
पण आता या प्रकरणाने एक नवीन वळण घेतलं आहे. डिलिव्हरी बॉय कामराजने या सर्व घटनेची दुसरी बाजू मांडली आहे. कामराजचा दावा आहे की त्या महिलेने स्वतःला दुखवले आहे. कामराज म्हणाले, “ट्राफिकमुळे डिलिव्हरी उशीर झाली आणि त्यासाठी मी तिची माफी मागितली. परंतु ती तरीही माझ्याशी भांडत होती. कॅश ऑन डिलिव्हरी असल्या कारणानं मी तिला पैसे मागितले आणि तिने ते देण्यास नकार दिला. या सगळ्यामध्ये तिने मला चप्पल फेकून मारली. मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना भांडणात त्या महिलेचाच हात तिला लागला आणि तिने घातलेल्या अंगठीमुळे तिला दुखापत झाली.
हितेशाच्या व्हिडीओनंतर कामराजने केलेलं वक्तव्य सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतंय. डिलिव्हरी बॉयचे विधान समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काही लोक कामराजची बाजू घेताना दिसत आहेत. हितेशी चंद्राणीच्या विरोधात नेटकऱ्यांनी हॅशटॅग फेमिनीजम चालू केलं आहे.