पेटीएमची ऑक्सिजन फॉर इंडिया मोहीम, भारताला ३ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावे लागत असल्याचा घटना घडत आहेत. कोरोनाच्या संकटात भारताला मदत करण्यासाठी अनेक देश तसेच विविध कंपन्या मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. आता आर्थिक सेवा देणारी पेटीएम कंपनीने भारताला ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर देणार असल्याची घोषणा केली आहे.
पेटीएम फाउंडेशने ३ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आयात करण्याची योजना बनवली आहे. यामुळे देशातील ऑक्सिजनची कमी दूर करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हे ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर हॉस्पिटल, क्लिनिक आणि रेजिडेंट वेलफेयर असोसिएशनला दिले जाणार आहे. पेटीएम कंपनीने भारतासाठी ऑक्सिजन फॉर इंडिया या नावाने एक नवीन मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेतून जनजागृती करण्यात येणार आहे. PayTm फाउंडेशनने १ हजार ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरच्या आयातीसाठी ऑर्डर दिल्या आहेत. कंपनीने लोकांकडून १० कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतात करोनाबाधितांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांची मोठी संख्या पाहता जगातील अनेक देशांनी भारताला मदतीची तयारी दर्शवली आहे. सिंगापूरने चार क्रायोजेनिक ऑक्सिजन टाक्या पाठवल्या आहेत. सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन ऑक्सिजन भारताला पाठवला असून क्रायोजेनिक टँकरमध्ये भरून भारतात आणला जात आहे. ब्रिटनकडूनही भारताला व्हेंटिलेन्टर्स आणि ऑक्सिजन पाठवण्यात आला आहे.