दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता पास करा-राज ठाकरे

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता पास करा, शेतकऱ्यांना हमी भाव द्या, वीजबिल माफ करावे अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याकडे सोमवारी केल्या.
लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी त्यांची समक्ष भेट घेण्यात येणार होती. पण त्यांच्या आसपास अनेक कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत त्यामुळे झूमवर संवाद केला. आणि या विषयावर चर्चा केल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पास करा
शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा, १०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांना पास केलं पाहीजे
रुग्णांना बेड मिळायलाच हवेत
राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळी सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत. हॉस्पिटल्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी, आम्ही हॉस्पिटल्सना जबाबदारीची जाणीव करून देऊ शकतो पण आमची जाणीव करून देण्याची पद्धत वेगळी आहे पण ही ती वेळ नाही असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
शेतकऱ्यांना हमी भाव द्या
सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा. त्याच बरोबर खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी आणि जिम सारख्या जागा जिथे विशेष गर्दी न होता जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा, १०वी, १२वी च्या विद्यार्थ्यांना पास केलं पाहिजे अशी सूचना सुद्धा राज ठाकरे यांनी केली.
वीजबिल माफी द्यायला हवी
बँकाकडून थकीत कर्जाच्या बाबतीत कर्जदारांकडे जो तगादा सुरु आहे त्यामुळे कर्जदार त्रस्त आहेत कारण मुळात उद्योग बंद आहेत, नोकऱ्या गेल्या आहेत अशा वेळेस जो तगादा सुरु आहे तो थांबायला हवा. ह्या सक्तीच्या वसुलीसंदर्भात बँकांशी सरकारने चर्चा करायला हवी. लॉकडाऊनच्या काळात वीजबिल माफी द्यायला हवी कारण मुळात उत्पादन सुरु नाही, ऑफ़िस बंद आहेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत लोकांनी भरमसाठ वीजबिल कशी भरायची? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
परप्रांतीय मजुरांची मोजणी करा आणि त्यांच्या चाचण्या करा
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत असं चित्र आहे पण ह्याला काही कारणं आहेत. महाराष्ट्र हे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य आहे त्यामुळे बाहेरील राज्यातून मोठ्या संख्यने लोकं येतात आणि ते जिथून येतात तिथे कोरोना चाचण्यांचं प्रमाण कमी आहे. मागच्या लॉकडाउनच्या वेळेला जेंव्हा परप्रांतीय कामगार निघून गेले तेंव्हा मी सरकारला सूचना केली होती की हे सगळे परत येतील तेंव्हा त्यांची मोजणी करा आणि कोरोना चाचण्या करा पण हे काही झालं नाही.
छोट्या उद्योगांनी त्यांचं उत्पादन चालू ठेवा पण त्याची विक्री होऊ नये असं सरकारचं म्हणणं आहे, पण मुळात जर विक्री होणार नसेल तर उत्पादन का करायचं? त्यामुळे आठवड्यात किमान २ ते ३ दिवस दुकानांना विक्रीची परवानगी द्यावी.