एअरपोर्टवर आता पेपरलेस आणि त्वरित बोर्डिंग

पुण्यासह देशात आणखी ३ एअरपोर्टवर फेशिअल रिकगनिशन प्रणालीचा वापर होणार
नवी दिल्ली: लवकरच देशातील ४ एअरपोर्टवर प्रवाशांसाठी त्यांचा चेहरा बोर्डिंग पास असणार आहे. पुढील तीन महिन्यात या एअरपोर्टवर फेशिअल रिकगनिशन ची प्रणाली वापरण्याची सुरुवात होऊ शकते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे विमानतळाचा समावेश आहे. याशिवाय देशातील वाराणसी, कोलकाता आणि विजयवाडा या इतर तीन विमानतळांचा समावेश आहे. या चार विमानतळांवर पुढील तीन महिन्यात पेपरलेस बोर्डिंगची तयारी करण्यात आली आहे. यामध्ये वाराणसी विमानतळावर सर्वात आधी ही प्रणाली सुरू होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढच्या एका महिन्यातच ही सेवा सुरू होऊ शकते.
पेपरलेस बोर्डिंगमुळे विमानतळावर एंट्री आणि बोर्डिंग प्रक्रिया याकरता लागणारा प्रवाशांचा वेळ वाचेल. लांबलचक रांगेत उभं राहणं प्रवाशांना टाळता येईल. तुमचा चेहरा स्कॅन करून तुमची ओळख होईल. एअरपोर्टवर दाखल झाल्यानंतर बोर्डिंगपर्यंत तुम्हाला बोर्डिंग पासची आवश्यकता भासणार नाही. ही प्रक्रिया काँटॅक्टलेस आणि त्वरित बोर्डिंग, बॅग ड्रॉप, सुरक्षा तपासणी आणि लाउंज ॲक्सेसची सुविधा प्रदान करेल
जपानी कंपनीला मिळाला कॉन्ट्रॅक्ट
विमानतळांवर फेशिअल रिकगनिशनची प्रणाली सुरू करण्यासाठीचे काँट्रॅक्ट जपानच्या कंपनी कॉरपोरेशनला देण्यात आले आहे. ही कंपनी फेशिअल रिकगनिशन प्रणालीतील तज्ज्ञ आहे. जगभरात अनेक ठिकाणी या कंपनीने काम केले आहे. जपानच्या NEC कॉरपोरेशनला हे काँट्रॅक्ट देण्यात आलं आहे
मुंबईतही सुरू आहे तयारी
पेपरलेस बोर्डिंग प्रणालीची सुरुवात या चार विमानतळांपासून होणार असली तरीही अन्य काही विमानतळांवर देखील याबाबतील तयारी सुरू आहे. यामध्ये मुंबईसह बेंगळुरू आणि हैदराबाद या विमानतळांचा समावेश आहे. याठिकाणी DIGI YATRA योजनेसंदर्भात आधीपासूनच काम सुरू आहे. दिल्ली एअरपोर्टवर देखील गेल्यावर्षी तीन महिन्यापर्यंत याची ट्रायल घेण्यात आली होती. हैदराबाद विमानतळावर देखील प्रयोग करण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही या विमानतळांवर ही प्रणाली लागू करण्यासाठी आणखी कालावधी जाऊ शकतो.