नेहरू… महाराष्ट्र… आणि यशवंतराव
राष्ट्राचा जो विकास झाला, तो टप्प्याटप्प्याने कसा झाला, हे आपण जाणतोच. त्यात महाराष्ट्राची नेमकी काय भूमिका होती, त्याचा वारसा चव्हाण साहेबांकडे कसा आला त्यातलं त्यांनी काय घेतलं काय सोडलं त्यातल्या परस्पर गोष्टींचा समन्वय कसा केला हे सुद्धा आपणाला बघितलं पाहिजे. म्हणजेच या सर्व गोष्टींचा संयुक्त महाराष्ट्रा मध्ये किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काय वाटा आहे काय योगदान आहे आपल्याला समजेल. थोडक्यात तो काळ केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पायाभरणीचा काळ होता. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या देशाची पायाभरणी सुरू होती. भाषावार प्रांतरचना नवी होती. यशवंतरावांचा हा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंही भारावलेला काळ होता.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीने २०१२ मध्ये महाराष्ट्रातील काही मान्यवरांना आमंत्रित करून त्यांची व्याख्याने कराड येथे आयोजित केली गेली होती. त्यातील एक मान्यवर म्हणजे विचारवंत व लेखक सदानंद मोरे यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगतात कि, यशवंतरावांची भूमिका ही होती की, महाराष्ट्र पाहिजे; परंतु तो वेगळ्या पद्धतीने मिळवायला हवा होता, हा एक त्याच्यातला मुद्दा होता. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांना विचारलं की, ” संयुक्त महाराष्ट्र आणि नेहरू यांच्या एकाची निवड करायची झाली, तर तुम्ही काय निवडाल? तर यशवंतराव म्हणाले मी संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरू पसंती देईन, महाराष्ट्रापेक्षा नेहरू श्रेष्ठ आहेत. “
या त्यांच्या विधानानंतर राजकारणात भयंकर गदारोळ झाला. महाराष्ट्र मध्ये अजूनही कधी कधी त्या वाक्याची आठवण होत असते. ते फक्त एक साधारण वाक्य नव्हतं तर त्यामागची धारणा अशी होती की, ज्यावेळी यशवंतराव असं म्हणतात की संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे तेव्हा त्यांना नेहरू ही व्यक्ती अभिप्रेत नसते. नेहरू हे भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून भारताचे एक प्रतीक आहेत. संयुक्त महाराष्ट्र पेक्षा नेहरू मोठे आहेत याचा अर्थ महाराष्ट्रापेक्षा हिंदुस्तान मोठा. त्यांचा कारकीर्दीच्या सुरुवातीला , जेंव्हा गांधी-नेहरूंचा संबंध आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की गांधी या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. समाजवादापासून रॉयवादाकडे, रॉयवादाकडून गांधींच्या विचारांकडे ते गेले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की नेहरु जे समाजवाद मांडतात, तोच या देशाच्या कल्याणाचा खरा विचार आहे. म्हणून नेहरूंच्या मागे जाणारे आणि त्यांचं अनुयायीत्व स्वीकारणारे यशवंतराव आपण पाहिले. परंतु ते नेहरूंचे अनुयायी काय एकदम झाले नाहीत. ते नेहरूंच्या मागे काही मिळवायला हि गेले नाहीत. त्यांना नेहरू पटले म्हणून ते गेले. त्यांचा स्वतःच्या समाजवादापासूनचा प्रवास नेहरूंच्या समाजवादाचा पर्यंत होता.
चव्हाण साहेबांची भूमिका म्हणजे, “भारतातील एकता ही सांस्कृतिक साध्यार्म्यावरती आधारलेली होती.” आपण ज्याला भारत देश म्हणतो तेव्हा तो आलिकडच्या अर्थाने. विशेषतः हा युरोपमध्ये ज्या प्रकारचा राष्ट्रवाद पुढे आला होता त्याप्रमाणे गेल्या काही शतकांमध्ये त्याला आपण नेशन-स्टेट म्हणतो. तर त्या प्रकारचा राष्ट्रवाद म्हणजे त्या प्रकारचा राष्ट्र, हे भारत देश होता का पूर्वी? सर चव्हाण म्हणतात की, ‘नाही. भारतात एकता होती, ती कसली एकता होती? ती सांस्कृतिक एकता होती.’ आपण पाहिलं की बारा ज्योतिर्लिंग चारधाम अशा गोष्टी चारी दिशांना आहेत. लोक तिकडे जातात. ज्योतिर्लिंग आपण ऐकून आहोत. अहिल्याबाईंनी जवळजवळ बारा ठिकाणी या ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे काम केलं होतं. अशा पद्धतीला आपण सांस्कृतिक ऐक्य म्हणतो. एकता साधर्म्य हे आपल्यात होतं ज्याला केंद्रीय सत्तेचा आधार नव्हता. एक राष्ट्र, एक राज्य ही कल्पना ही अस्तित्वात नव्हती. म्हणूनच आता सांस्कृतिक एकतेवर राजकीय प्रक्रिया करून आधुनिक कल्पनेप्रमाणे प्रक्रिया करून भारत हे एकसंध राष्ट्र बनवणे आपले कर्तव्य आहे.
चव्हाण साहेबांनी ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे सांगितली कि, आपण राजकीय राष्ट्र नव्हतो, हे कबूल करण्यात काही खेद बाळगण्याचे कारण नाही. एका वेगवेगळ्या पातळीवर आपण राष्ट्र होतो आणि वेगळ्या पातळीवर ती नव्हतोही. ते आता आपलं काम आहे. भारत एकसंध करण्याची प्रक्रिया त्यांना राजकीय प्रक्रियेत अभिप्रेत होती. जर संयुक्त महाराष्ट्र असेल किंवा आणखीन कुठल्या चळवळी असतील, या चळवळीमुळे भारत अशा पद्धतीने एकसंध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येत असेल तर, चव्हाण साहेब त्या चळवळीला पूर्णपणे मनापासून पाठिंबा देणार नाही ते अगदी सरळ, स्वच्छ व उघड होतं. त्या काळामध्ये तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत मोठ्या स्वरूपात सक्रिय होती त्या काळात देखील त्यांना हे नाही पटलं. त्यांनी वेगळी भूमिका घेतली विश्वाच्या दृष्टिकोनातून पाहणारा तो माणूस होता. त्यांच्यावर भरपूर टीका झाली. आचार्य अत्रे यांच्यासारख्या पत्रकारांनी काही विशेषणे ही वापरली होती.
याच्याशी संबंधित, आणखी एक उदाहरण म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडेही त्यावेळेला हिंदुमहासभा वाले गेले होते. जयंतराव टिळक वगैरे लोक देखील त्यात होते. सावरकरांकडे जाण्याचा उद्देश हा होता की त्यांना हिंदू महासभेचा पाठिंबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाहिजे होता. आताच स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर राष्ट्रवादी, अखंड हिंदुस्तानवादी. हे लोकं तिथे गेले तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांना चक्क नाही म्हणून सांगितलं. परंतु सावरकरांनी पाठिंबा देण्याचे नाही सांगितले , जर हे लोकांना जाहीर करायचं तर लोकं काय म्हणतील?
हा प्रश्न स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तीचा नव्हता तर हिंदुमहासभा नावाच्या एका राष्ट्रीय पक्षाचा होता. तेव्हा हिंदू महासभेच्या लोकांनी जाहीर सांगितलं की, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा आहे. नसतानाही सांगितले. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सगळ्या लोकांनी, सर्व व्यक्तींनी निरपवादपणे संपूर्ण पाठिंबा दिलाच पाहिजे असा आपण आग्रह धरण्याचे कारण नव्हतं. या चळवळीला धरून अनेकांची अनेक मते असू शकतात. तेव्हा सावरकर म्हणाले होते की, ‘ संयुक्त महाराष्ट्र ,हा काय प्रकार आहे? मी भारतमातेला फक्त ओळखतो. आणखी आंध्र माता किंवा महाराष्ट्र माता अशी काही भानगड नाही. “