पंढरपूर पोटनिवडणूक : अनेक गावात घरटी रुग्ण, निवडणुकीनंतर संसर्गात प्रचंड वाढ!

pandharpur-by-election-home-sick-in-many-villages-huge-increase-in-infection-after-election
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

पंढरपूर : मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून यामुळे या दोन्ही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कोरोनामुळे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले आणि यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीनंतरचे भीषण चित्र आता समोर येऊ लागल्याने निवडणूक चांगलीच अंगलट आली म्हणायची वेळ आता जनतेवर आली आहे. गावेच्या गावे आजारी पडू लागली असून हॉस्पिटलमध्ये रुग्ण ठेवायला जागा नाही. यातच रोज शेकडोंच्या संख्येने नवीन रुग्ण समोर येत आहेत. यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसीपैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपच्या सभा झालेल्या भोसे, बोराळे सारख्या अनेक गावात सध्या घरटी रुग्ण सापडू लागले असून तपासणीच नसल्याने रुग्णांची मर्यादित संख्या समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे आमदार संजयामामा शिंदे असतील किंवा आमदार अमोल मिटकरी असतील भाजपचे प्रचार प्रमुख बाळा भेगडे असतील ही मंडळी आता कोरोनाग्रस्त झाली आहेत. शेकडोच्या संख्येने लहान मोठे कार्यकर्तेही आता कोरोनावर उपचार घेत आहेत. पण गावागावात फिरून माहिती घेतल्यावर परिस्थिती किती बिकट बनत चाललीय याचा अंदाज येतोय. मंगळवेढा तालुक्यात २५ गावात सध्या कोरोनाचा कहर सुरु असून इतर गावातही रुग्णांचा आकडा फुगू लागला आहे.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे.यासाठी सोलापूर जिल्ह्यास मंजूर लसीपैकी पन्नास टक्के लसी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यास मिळाव्यात, अशी मागणी आ.परिचारक यांनी केली आहे. याबाबतचे पत्र आ.परिचारक यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना मेलद्वारे पाठविले आहे. यामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन्ही तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक करोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत.आजपर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *