पंढरपूर पोटनिवडणूक; गर्दी प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

पंढरपूर: पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी पंढरपूर दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविल्याचे पाहायला मिळाले. यावर टीका झाल्यानंतर आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आता अजित पवार यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कडक निर्बंध लावण्यात आले आहे. सर्वसामन्य नागरिकांना एक न्याय आणि राज्यकर्त्यांना एक न्याय असा प्रश्न विरोधी पक्षाने उपस्थित केला होता. विरोधी पक्षाने आपली मागणी लावून धरल्यानंतर प्रशासनाने उशिरा रात्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्या श्रीकांत शिंदेवर गुन्हा दाखल केला. आता अजित पवार यांच्यावर काही कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे, यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा
मुख्यमंत्र्यांनी हिम्मत दाखवत अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अजित पवार हे काही आकाशातून पडले नाहीत, ते सर्वसामान्य आहेत. उद्या मी किवा देवेंद्र फडणवीस यांनी नियमाचे पालन केले नाही तर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केली.