पुणे जिल्ह्यातील एक हजार पाणंद रस्ते होणार खुले
पुणे: पाणंद रस्त्यांचा प्रामुख्याने शेतीमधील कामाकरता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोग होतो. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही शेत-पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे असते.
शेतीमध्ये दिवसेंदिवस मनुष्यबळ हे कमी होत आहे. त्यामुळे साहजिकच कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही सध्याची अपरिहार्य गोष्ट बनलीये. शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज असते. असे शेतरस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नाहीत त्यामुळे निधी जमा करायला जरा अडचणी येत होत्या यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने विविध योजनांच्या अभिसरणामधून पाणंद रस्ते योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पण ही योजना राबविल्यानंतर सुद्धा अतिक्रमणे, स्थानिक वाद, भावकीचे वाद यामुळे अनेक रस्ते बंद आहेत.
पुणे जिल्ह्यात नव्याने शेती पाणंद रस्ते योजना हाती घेण्यात आली आहे. डॉ. राजेश देशमुखांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणेची बैठक घेतली. मे महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार रस्ते खुले करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेऊन लोकसहभाग आणि ‘सीएसआर’ निधीतून रस्त्यांचं बळकटीकरण करण्यात येणार आहे. ‘पाणंद रस्ते खुले झाल्यास अनेक रस्त्यांचे वाद संपुष्टात येतील. ग्रामस्तरीय समितीच्या बैठका घेऊन गावात किती पाणंद रस्ते, शेती रस्ते आहेत, किती रस्त्यांवर आक्रमण झालंय या सर्वाची माहिती गोळा केली जाणार असल्याचे डॉ.राजेश देशमुख योजनेची माहिती देताना म्हणालेत. त्यानंतर लगेचच कामाला सुरवात होईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.