व्हेंटीलेटर बेड अभावी पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचा दिल्लीत मृत्यू

दिल्ली : पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना वेळेवर व्हेंटीलेटर बेड मिळाला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पंडित राजन मिश्रा यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर किडनीचा त्रास वाढल्याने दिल्लीतील सेंट स्टीफन रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. मात्र वेळेवर व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
त्यांना किडनीचा त्रास असल्याने डायलेसिस करण्यात आले होते. उपचारा दरम्यान रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयातील आयसीयु विभागात भर्ती करण्यात आले. मात्र, त्यावेळी एकही व्हेंटीलेटर बेड उपलब्ध नव्हता. तेथील डॉक्टरांनी राजन मिश्रा यांना व्हेंटीलेटर बेडची गरज असून आमच्या रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले.
यानंतर पंडित राजन मिश्रा यांच्या नातेवाईकांनी अनेक रुग्णालयात व्हेंटीलेटर बेडची विचारणा केली. मात्र, कुठेच व्हेंटीलेटर बेड उपलब्ध झाला नाही. त्यानंतर काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांची तब्बेत अधिक बिघडली होती. नातेवाईक, काही मंत्री आणि नेत्यांनी पंडित राजन मिश्रा यांना व्हेंटीलेटर बेड मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर काही वेळेनंतर त्यांना बेड मिळाला मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती.
राजन आणि साजन मिश्रा या भावांची जोडी प्रसिद्ध होती. दोघेही एकत्र कार्यक्रम सादर करत होते. जगभारत राजन-साजन जोडीने कार्यक्रम केले आहेत. राजन मिश्रा प्रसिद्ध गायक होते. २००७ मध्ये भारत सरकारने त्यांना कलाक्षेत्रातील योगदाना बद्दल पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित केले होते. बनारस घराण्याचे असलेले राजन यांनी १९७८ मध्ये त्यांचा पहिला संगीत कार्यक्रम श्रीलंकेत केला होता. त्यानंतर त्यांनी जर्मनी, फ्रान्स आदी देशांमध्ये त्यांनी कार्यक्रम केले.