ऑक्सिजनचा तुटवडा : ६१ रुग्णांचे जीव टांगणीवर, रुग्णालय प्रशासनाची मोठी दमछाक!

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळणं कठीण होऊन बसलं आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताणा आला आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवताना दिसत आहे. राज्यभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सध्या तुटवडा आहे. ऑक्सिजनचा साठा संपला तर रुग्णांचा जीवही जाऊ शकतो. याबाबत आज नाशिकमध्ये घडलेली घटना ताजी आहे.
याचबाबत आणखी एक घटना समोर आली घाटकोपरमध्ये हिंदू सभा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला ज्यामुळे ६१ रुग्णांचे जीव टांगणीवर लागले आहेत. रुग्णालयाची ऑक्सिजनसाठी धावपळ सुरु झाली आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. रुग्णालयात आज सकाळपासून ऑक्सिजनचा साठा कमी आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरु आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने संपर्क साधला तर ऑक्सिजन पुरवू, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
“आक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्या दिवसाला एकदा, दोनदा किंवा रात्रीही ऑक्सिजन पुरवत आहेत. पण ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपन्यांकडेही सध्या ऑक्सिजन नाही. आमच्याकडे ऑक्सिजन आलं की आम्ही देऊ, असं ते सांगत आहेत. जेवढे ऑक्सिजन प्रोव्हायडर आहेत त्यांना वेळेवर ऑक्सिजन द्यावा, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे. तसेच सगळ्या रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडरची समस्या येत आहे. त्यामुळे सरकारने रुग्णालयांमध्ये बॅकअप सिलेंडर बसवावा, असं कंपन्यांना सांगावं”, अशी प्रतिक्रिया हिंदू सभा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.
हिंदू सभा रुग्णालयाकडे संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन पुरवठा होता. याबाबत रुग्णालयाने राज्य सरकारला पाठवलेले पत्रही सोशल मीडियावर सकाळपासून व्हायरल झालं होतं. ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाची मोठी दमछाक झाली. याबाबत ‘टीव्ही ९ मराठी’ने बातमी प्रदर्शित केली. या बातमीची दखल घेत अखेर संध्याकाळी रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवण्यात आलं.