Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचाजिथे आडवतील त्या ठिकाणी बसण्याची आमची तयारी, बंडातात्यांचा पोलिसांना इशारा

जिथे आडवतील त्या ठिकाणी बसण्याची आमची तयारी, बंडातात्यांचा पोलिसांना इशारा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानात केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी या निर्णयाविरोधात देहूच्या वेशीवर तीन वाजल्यापासून आंदोलन सुरु करण्याची घोषणा केलीय. ही घोषणा करताना त्यांनी वारकरी समाजाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात? असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. त्याचप्रमाणे बंडातात्यांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे यांच्यावरही टीका केलीय.

“यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे,” असं बंडातात्या कराडकर यांनी दीड आठवड्यापूर्वी सातारा येथे म्हटलं होतं. हीच भूमिका कायम असल्याचं आज बंडातात्यांनी स्पष्ट केलं आहे. “आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहे. देहूकरांनी कोणती भूमिका घ्यावी त्याचं स्वातंत्र्य देहूकरांना आहे. हा वैयक्तिक निर्णय आहे असं जेव्हा देहूकर म्हणतात तेव्हा या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला. आता नागपूर, वर्धा येथून सुद्धा वरकरी भावी उन्हातान्हामध्ये उभे आहेत. वैयक्तिक निर्णयाला एवढा प्रतिसाद कसा देतो. हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषय असल्याने हा वैयक्तिक निर्णय आहे, असं विधान देहूकर कसं काय करु शकतात?” असा प्रश्न बंडातात्यांनी उपस्थित केला आहे.

व्यवस्थापन देहूच्या आत असून आम्ही देहूच्या वेशीवर आंदोलन करणार आहे असंही बंडातात्यांनी सांगितलं आहे. “व्यवस्थापन देहूच्या आत असून आम्ही देहूच्या बाहेर आहोत. व्यवस्थानची संकल्पना अशी आहे शासन निर्णयाला बाधा येऊ नये म्हणून नियंत्रित लोकांच्या उपस्थितीत करु. आमचं म्हणणं असं आहे की देहूसाठी येणारा जो सामान्य वारकरी समाज आहे तो वारकरी समाज कोणत्यातरी श्रद्धेने येतो आहे. आपण या वारकरी समाजाची मुस्कटदाबी अशापद्धतीने किती दिवस करणार आहात?, पंढरपूरला यायचं नाही, गावातून दिंडी काढून चालायचं नाही. माझा देहूकरांना एक सामान्य प्रश्न आहे. मागील वर्षी या उत्सव काळामध्ये या रोगाचं भयानक स्वरुप होतं. गेल्या वर्षी कार्तिक वारीपर्यंत सरकारनं मंदिरही खुलं केलं नव्हतं. अशा काळामध्ये सरकारचा आदेश मोडून माणिक महाराजांनी देहू ते पंढरपूरवारी कोणत्या आधारावर केली होती? तेव्हा त्यांना आपण शासनाचा आदेश मोडतोय असं माणिक महाराजांना वाटलं नाही का?” असा प्रश्न बंडातात्यांनी विचारला आहे. टाळ वाजवत, भजनं म्हणत, दोन माणसांमध्ये तीन फुटांचं अंतर ठेवत, मास्क घालून, शांतेतनं कोणत्याही घोषणा दिल्या जाणार नाही. पोलीस आमच्या समाजाला जिथे आडवतील तिथे आहे त्या ठिकाणी बसण्याची आमची तयारी आहे, असंही बंडातात्या म्हणालेत.

बंडातात्यांनी केलेल्या आवाहानानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी,  “वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नेते बंडातात्या कराडकर यांनी नुकताच सोशल मीडियावर आणि मुलाखतीत भाविकांना देहू येण्यास आवाहन केले. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. वारकरी मोठ्या संख्येने देहू येथे आले तर त्या मंडळीमुळे कोविडचा प्रसार जास्त वेगाने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त वारकरी संप्रदायाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत आणि भक्त मोठ्या संख्येने येथे जमा झाल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांची खात्री पटवून देत आहेत”, असं स्पष्ट केलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments