…नाहीतर आपण केलेले प्रयत्न वाया जातील! संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाचा ‘हा’ निर्णय

Otherwise your efforts will be wasted! The administration's 'yes' decision to reduce infection
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन सुरू होताच राज्यातील परप्रांतीय मजुरांनी आपल्या राज्यात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी पहिल्यांदा लॉकडाऊन करण्यात आला होता त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारे परप्रांतीय मजुर आपल्या राज्यांत गेले होते आणि पुन्हा अनलॉक होताच परतले. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लाखोंच्या संख्येत परप्रांतीय आपल्या राज्यात परतले आहेत. पण आता महाराष्ट्रात परतणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर येणाऱ्या सर्व परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी म्हणून मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र, ते आपल्यासोबत संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहोत ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरुन त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल.
महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिल्ह्या-जिल्ह्यांत याची अंमलबजावणी करावी लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या संदर्भातील परिस्थितीच्या संदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यांतून येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *