‘…अन्यथा दररोज त्यांना जिथे दिसतील तिथे चपलेने मारु ‘, भाजपच्या आमदाराला चक्क भाजपच्याच माजी प्रवक्त्याची धमकी ! सात दिवसांचा दिला अल्टीमेटम

उल्हासनगर : उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांना त्यांच्याच पक्षाच्या माजी प्रवक्त्याने एक विचित्र धमकी दिली आहे. उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी हे कोरोनाच्या कठीण काळात शहरात फिरत नाही. तसंच ते लोकांची काहीही मदत करत नसल्याचा आरोप भाजपच्याच माजी प्रवक्त्यानं केला आहे. इतकंच नाही तर या प्रवक्त्यानं आमदार कुमार आयलानी यांना चक्क सात दिवसांचा अल्टीमेटम देखील दिला आहे.
आयलानी हे त्यांच्या कुटूंबासोबत त्यांच्या लोणावळ्याच्या कुमार रिसॉर्टला जास्त असतात,लोकांची कामं करत नाहीत. येत्या आठ दिवसात कुमार आयलानी यांनी दररोज शहरात फिरावं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा त्यानंतर त्यांना दररोज आम्ही चपलेने मारू, असा इशारा भाजप माजी प्रवक्ते राम वाधवा यांनी दिला आहे.
आयलानी यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ उरला आहे. त्यामुळे तितके दिवस आमच्यापैकी कुणीतरी दररोज त्यांना जिथे दिसतील तिथे चपलेने मारु. त्यासोबतच पोलीस आमच्यावर केस करणार असतील, तर त्यासाठीही आम्ही सगळी तयारी केली आहे. जामीन, वकील तयार ठेवले आहेत, असेही राम वाधवा म्हणाले.
या सगळ्या प्रकारानंतर उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.
राम वाधवा यांनी याबाबत ट्वीट केले असून त्यात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही टॅग केले आहे. या सगळ्याबाबत आमदार कुमार आयलानी यांना विचारलं असता, त्यांनी आपण दररोज लोकांचीच कामं करत असल्याचं सांगितलं. आपण दररोज दिवसभर ऑफिसला बसलेलो असतो. शिवाय शहरातही एकटे फिरतो. त्यामुळे ज्यांची हिंमत असेल त्याने मला फक्त हात लावून दाखवावा, असा अप्रत्यक्ष इशारा आयलानी यांनी राम वाधवा यांना दिला आहे.
या सगळ्यानंतर आमदार कुमार आयलानी यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राम वाधवा यांची तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. राम वाधवा यांनी यापूर्वी निवडणुकीच्या काळात पप्पू कलानी यांना आतंकवादी म्हणून संबोधलं होतं. त्यामुळेही बराच वाद उल्हासनगर शहरात पेटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा रीतीने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पुढे त्याचं नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल.
Ulhasnagar BJP MLA all promises broken. Inablity to help people during pandemic. Disappeared to his Resort. We warn him to return back to constituency and help people with 7 days else we will start throwing Chappal on him everyday wherever he's seen @OfficeofJPNadda @ChDadaPatil
— Ram Wadhwa (@ram_wadhwagroup) May 9, 2021